नंदुरबार : अश्लील व्हिडीओ कॉल करुन खंडणी वसुल करणा-या महिलेसह पोलिस कर्मचारी आणि एका स्थानिक पत्रकाराला नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. नंदुरबार येथील एका महिलेने पोलिसाच्या मदतीने शहादा तालुक्यातील म्हसावद येथील रहिवासी व्यक्तीला आपल्या जाळयात फसवले. या जाळ्यात अडकल्यानंतर त्याच्याकडून तिघांनी मिळून नऊ लाख रुपये खंडणीच्या माध्यमातून वसुल केले. तक्रारदार पिडीत व्यक्तीला त्रास असह्य झाल्यानंतर त्यान शहादा पोलिसात धाव घेतली. अखेर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.
छोटू तुमडू शिरसाठ (46) असे खंडणी प्रकरणात सहभागी पोलिस कर्मचा-याचे तर अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी) (50) असे तथाकथित पत्रकाराचे नाव आहे. 9 एप्रिल रोजी म्हसावद येथील पिडीत तक्रारदारास अनोळखी महिलेचा त्याच्या मोबाईलवर कॉल आला. ती महिला त्याला वारंवार फोन करुन बोलावू लागली. बोलावून देखील येत नसल्याचे बघून त्या महिलेने त्या व्यक्तीला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉल दरम्यान सदर महिलेने अश्लिल चाळे सुरु केले. त्या व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डींग केले.
त्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी पिडीत तक्रारदारास पोलिस कर्मचारी छोटू शिरसाठ याने बदनामीची भिती दाखवत मध्यस्ती करण्याची तयारी दाखवली. सुरुवातीला चौदा लाख रुपयांची मागणी तक्रारदारास करण्यात आली. तडजोडीअंती व्हिडीओ क्लिप नष्ट करण्याच्या अटीवर पोलिस कर्मचारी छोटू शिरसाठ याच्या माध्यमातून नऊ लाख रुपये तक्रारदाराकडून घेण्यात आले. ते नऊ लाख रुपये व्हिडीओ कॉल करणा-या महिलेस देण्यात आले.
आता विषय संपला असे वाटत असतांना तथाकथित पत्रकार अतुल चौधरी हा तक्रारदाराच्या मागे पडला. तो देखील बदनामीच्या भितीचा सापळा त्याच्यावर फेकून नऊ लाख रुपये मागू लागला. अखेर तक्रारदाराने पोलिस अधिक्षक पी.आर. पाटील यांना भेटून आपबिती कथन केली. शहादा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत आणि एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाईचे आदेश देण्यात आले. याप्रकरणी शहादा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.