दुकानदाराला जखमी करणा-या दोघांना अटक

जळगाव : दुकान चालवायचे असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागतील अशी धमकी दिल्यानंतर नकार मिळाल्यानंतर दुकानदाराला चाकूसारख्या तिक्ष्ण हत्याराने जखमी करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गणेश अर्जुन कोळी व राहुल रामचंद्र ब-हाटे अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

शिवराम आसाराम शिंदे हा तरुण एमआयडीसी व्ही सेक्टर परिसरात नाश्त्याची गाडी लावून चरितार्थ चालवतो. 1 जून 2022 रोजी गणेश कोळी आणि राहुल ब-हाटे या दोघांनी त्याच्याजवळ येवून तुला दुकान चालवायचे असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागतील अशी धमकी दिली. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत असे शिवराम शिंदे याने दोघांना म्हटल्यानंतर दोघांना त्याच्या बोलण्याचा राग आला. त्यानंतर गणेश कोळी याने शिवराम यास समोरुन पकडून ठेवत राहुल ब-हाटे याने चाकू सारख्या धारदार शस्त्राने कमरेच्या खाली दुखापत केली. तसेच त्याची नाश्त्याची गाडी उलटवून नुकसान केले. वैद्यकीय उपचार घेत असतांना जखमी शिवराम याने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवराम शिंदे याच्यावर हल्ला झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांचे पथक लागलीच घटनास्थळी दाखल झाले होते. जखमीस पोलीस मित्र युसुफ खान व राजू पटेल यांच्या मदतीने सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान दोघे हल्लेखोर पसार झाले होते. दोघे हल्लेखोर भोलाने या गावी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजल्यानंतर त्यांच्या तपास पथकातील कर्मचारी वर्गाने त्यांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, किशोर पाटील, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, मुकेश पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील दोघे आरोपी पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आहेत. राहुल ब-हाटे यास दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. त्याची हद्दपारी दोन महिन्यापूर्वी रद्द झाली होती. त्यानंतर त्याने सदरचा गुन्हा केला आहे. दोघांना न्या.व्ही.सी. जोशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास हे.कॉ. विजय पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here