नाशिक : अंबड लिंक रोडवरील ग्लोबल हॉस्पीटलमधील डॉक्टरांना मारहाण करणा-या रुग्णाच्या तिघा नातेवाईकांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. रुग्ण दगावल्याचा राग मनात धरुन मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मागील आठवड्यात एका महिलेस दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर महिला रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला होता. महिला रुग्णाच्या मृत्यूचे कारण विचारण्यास गेलेल्या समुहाने डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधे कैद झाला होता.
मारहाणीत जखमी झालेल्या डॉ. दिनेश पाटील यांनी अंबड पोलीस स्टेशनला याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांच्या वर्णनावरून मागोवा घेत पंचवटी परिसरातून पियुष उल्हास राजुरकर (३०) गुंजाळबाबानगर, हिरावाडी, आकाश अशोक पाटील (२६) वाल्मीकनगर, वाघाडी), संग्राम बबन बारकु-पाटील (४४) रा.पाण्याच्या टाकीजवळ वाघाडी यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.
वैद्यकिय सेवा, व्यक्ती, संस्था हिंसक कृत्य व मालमत्ता हानी कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. तिघा हल्लेखोरांना न्यायालयात हजर केले असता सहा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक कमलाकर जाधव करत आहेत.