नाशिक : ठेकेदाराकडून दिड लाख रुपयांची लाच घेणारा नाशिक जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा शाखा अभियंता सध्या एसीबीच्या ताब्यात आहे. अमोल खंडेराव घुगे (43) असे लाच स्विकारणा-या अभियंत्याचे नाव आहे. 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली.
सरकारी कामाचा कंत्राटदार असलेल्या तक्रारदाराने मौजे पाथरे (ता. सिन्नर) येथे नळ पाणी पुरवण्याचे काम रितसर पूर्ण केले आहे. या कामाचे 48 लाख रुपयांचे बिल मंजुरीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आले. संबधित शाखा अभियंता अमोल घुगे याने सदर बिल मंजूर करण्यासाठी चार टक्के दराने 1 लाख 90 हजार रुपयांची मागणी कंत्राटदाराकडे केली. तडजोडीअंती 1 लाख 50 हजार रुपये देण्याघेण्याचे ठरले. मात्र कंत्राटदारास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार सापळापुर्व प्रक्रीया पार पाडण्यात आली. या सापळा कारवाईत अभियंता घुगे यास दिड लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली.