दक्षिण सोलापूर : विजापूर महामार्गावर असलेल्या नांदणी टोल नाक्यावर तैनात कर्मचा-यांनी टोल मागितल्याचा राग आल्याने मी पोलिस आहे, माझी गाडी सोडा अशी दमदाटी करत मारहाण व तोडफोड केल्याप्रकरणी पोलिस कर्मचा-यासह चौघांना पोलिस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे. राज्य राखीव पोलिस दलातील पोलिस कर्मचारी शिवशंकर बबनराव शिकारे, त्याचा भाऊ सुरज बबनराव शिकारे तसेच रोहन सुरेश जाधव, गजानन अण्णाराव कोळी अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याशिवाय अजून दोघांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंद्रुप पोलिस स्टेशनला दाखल या गुन्ह्यातील पोलिस कर्मचारी शिवशंकर शिकारे यास राज्य राखीव पोलिस दलाचे कमांडंट विजयकुमार चव्हाण यांनी निलंबीत केले आहे.
3 जून रोजी सहा संशयित आरोपी रात्री जेवण करण्यासाठी टाकळी येथील एका हॉटेलवर इनोव्हा (एमएच 02 एक्यु 4455) ने गेले होते. परतीच्या प्रवासात रात्री साडेबारा वाजता टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना टोलची मागणी केली. टोलची मागणी होताच ‘मी पोलिस आहे गाडी सोडा’, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र कर्मचा-यांनी टोल पावतीशिवाय गाडी सोडण्यास नकार दिला. त्यानंतर टोल कर्मचा-यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली.
या घटनेदरम्यान गाडीतील एकाने तलवार बाहेर काढून धाक दाखवण्यास सुरुवात केली. यावेळी महांतेश सोनकंटले हा कर्मचारी जखमी झाला. इतर दोघा कर्मचा-यांना देखील मारहाण करत कंट्रोल रुमचे काच दगडाने फोडण्यात आले. याशिवाय बायोमेट्रिक मशीन फोडून सुमारे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स.पो.नि. डॉ. नितीन थेटे, फौजदार अमितकुमार करपे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गुन्ह्यात वापरलेली गाडी व तलवार जप्त करण्यात आली आहे.