जळगाव : जळगाव शहरातील राजकमल टॉकीज नजीक असलेल्या भंगाळे गोल्ड या सुवर्ण पेढीसाठी दागिने तयार करुन देणा-या कारागिराने 14 लाख 11 हजार 649 रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अस्ता तारक रॉय रा. मातोश्री बिल्डींग शनीपेठ जळगाव मुळ रा. पश्चिम बंगाल असे फसवणूक करणा-या बंगाली कारागिराचे नाव आहे. सदर कारागिर भंगाळे गोल्ड या सुवर्ण पेढीसाठी लागणारे दागिने गेल्या चार वर्षापासून तयार करुन देत होता. त्यामुळे त्याच्यावर भंगाळे यांचा विश्वास बसला होता. आपल्यावर विश्वास संपादन झाल्याचे लक्षात आल्यानंतर कारागिराने हा प्रकार केल्याचे दिसून आले आहे.
सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी 24 कॅरेटचे वेगवेगळ्या वजनाचे सोन्याचे तुकडे कारागिराने नेले होते. या सोन्यात काही दागिने नव्याने तर काही दागिने रिपेरिंग करायचे होते. 273.269 ग्रॅम वजनाचे एकुण 14 लाख 11 हजार 649 रुपये किमतीचा ऐवज कारागिराने फसवणूकीच्या इराद्याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी भंगाळे यांचा विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश भागवत भंगाळे यांनी याप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. गु.र.न. 79/22 भा.द.वि. 420, 406 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.