व्याजाच्या पैशांवर सागरच्या दादागीरीचे कुरण!!- आरिफच्या हातून आले त्याला रक्तरंजीत मरण

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): संगतीत आल्याशिवाय आणि पंगतीत बसल्याशिवाय जवळीक निर्माण होत नसते. जवळीक निर्माण होण्यासाठी संगत आणि पंगत या दोन्ही घटकांचा मेळ बसावा लागतो. एका विशीष्ट धेय्याच्या दिशेने वाटचाल करणा-या समविचारी लोकांना एकमेकांच्या संगतीत येण्यास वेळ लागत नाही. एकदा संगतीत आले म्हणजे त्यांची पंगत बसल्याशिवाय रहात नाही. पंगत ही एखाद्या शेतात भारतीय बैठक स्वरुपात देखील असते अथवा एखाद्या बिअर बारमधील टेबलवर देखील असते. बिअर बारच्या टेबलवरील बैठक देखील एक पंगतच म्हटली जाते. कारण त्यापुर्वी सर्व संबंधितांची संगत घडलली असते. संगत ही पंगतीची पहिली पायरी असते. एखाद्या विशीष्ट धैय्याने पछाडलेले लोक आपला हेतू साध्य करण्यासाठी पंगती घडवून आणतात. या पंगतीत अनेक निर्णय घेतले जातात. गुन्हेगारांची पंगत वारंवार घडत असते. या बैठक वजा पंगतीत कुणाचा गेम करायचा? कुणाकडे दरोडा टाकायचा? कुणाचा कसा आणि केव्हा काटा काढायचा? कुणाला फाटा द्यायचा? हे धोरण आणि नियोजन ठरत असते. अशा पंगती शक्यतो रात्री नऊ – दहा वाजेनंतर सुरु होतात आणि उशिरापर्यंत चालतात. अंगी गुन्हेगारी वृत्ती असलेल्या टोळ्यांच्या पंगतीत मद्यपानाशिवाय कोणतेही धोरण आणि निर्णय ठरत नाही असे म्हटले जाते.  

सागर वासुदेव पाटील हा तरुण गुन्हेगारी वृत्ती असलेल्या मित्रांच्या संगतीत वाढला होता. गुन्हेगारी संगतीची पहिली पायरी तो अलगद चढला होता. त्यामुळे पुढील पंगतीच्या पाय-या भराभर चढण्यास त्याला अजिबात वेळ लागला नाही. जळगाव शहरातील कासमवाडी – इश्वर कॉलनी परिसरात राहणा-या सागरचे अनेक मित्र होते. ते मित्र म्हणजे जणू काही गुन्हेगारांची बालवाडी होती. या बालवाडीतून पुढच्या टप्प्यातील पाठशाळेत त्याला गुन्हेगारीचे बाळकडू मिळाले. ते बाळकडू मिळाल्याने त्याला मद्याची चव कधीच कडू लागली नाही. त्याच्याविरुद्ध मारामारी, खून अर्थात शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल झाले. सन 2015 मधे सुरुवातीला प्राणघातक हल्ला व नंतर खूनात परिवर्तीत झालेल्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. पंचमुखी हनुमान मंदीर परिसरात चंद्रकांत पाटील नामक तरुणाच्या हत्येत सहभाग असलेला सागर पाटील औरंगाबाद खंडपीठातून अपिल जामीनावर सुटून जेलच्या बाहेर आला होता. वरवर रिक्षा चालकाच्या भुमिकेत वावरणारा सागर आतून गुन्हेगारी कारवाया करत होता. गुन्हेगारीसोबत त्याची युती झाली होती. व्याजाने पैसे देणे आणि दडपशाही पद्धतीने ते वसुल करणे हा देखील त्याचा एक व्यवसाय होता. अवघा बारा वर्षाचा असतांना त्याचे वडील वारले होते. त्यामुळे आईशिवाय त्याच्यावर कुणाचे फारसे दडपण नव्हते. आई काही दिवसभर त्याच्यामागे काठी घेऊन लक्ष देऊ शकत नव्हती. त्यामुळे कुसंगत घडण्यास त्याला वेळ लागला नाही.

आजिम खान हा सागरचा मित्र होता. आजिमच्या माध्यमातून आरिफ शहा या तरुणासोबत सागरचा परिचय झाला. दोन वर्षाची ओळख झाल्यानंतर आरिफ हा सागरकडून गरजेनुसार वेळोवेळी उधार पैसे घेऊन ते व्याजासह परत करत होता. अनेकदा दोघेजण मद्यप्राशन करण्यास बसत होते. मजुरी करणा-या आरिफ शहा अयुब शहा यास ईद सणानिमीत्त पैशांची गरज होती. सण साजरा करण्यासाठी आरिफने सागरकडे व्याजाने दहा हजार रुपये मागितले. गुन्हेगारीत पारंगत झालेल्या सागरने आरिफला दहा हजार रुपये दिले. मात्र देतांना त्या घटनेचा एक व्हिडीओ तयार करुन घेतला. ईद सण साजरा केल्यानंतर आरिफने सागरला व्याजासह सतरा हजार रुपये परत केल्याचे आरिफचे म्हणणे होते.    

3 जून रोजी दुपारच्या वेळी आरिफ व त्याच्यासोबत जुबेर शेख नावाचा त्याचा मित्र असे दोघे जण कासमवाडी परिसरातील मासळी बाजारात बसले होते. त्यावेळी सागर पाटील त्यांच्याजवळ आला. दहा हजार रुपये उधार घेतल्याचा व्हिडीओ सागरने आरिफ यास दाखवला. व्हिडीओ दाखवल्यानंतर सागरने आरिफला दहा हजार रुपयांची मागणी केली. लवकरात लवकर मला दहा हजार रुपये पाहिजे असा दम सागरने आरिफला दिला. जर मला पैसे मिळाले नाही तर हा व्हिडीओ मी तुझ्या घरी येऊन तुझ्या वडीलांना दाखवेन असा देखील सागरने त्याला दम भरला. मी व्याजासह सर्व पैसे तुला परत केले असून आता आपला कोणताही व्यवहार राहिलेला नाही असे आरिफने सागरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र सागर त्याचे काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. तु कसा पैसे देत नाही…… तुझा बाप पैसे देईल अशी धमकी दिल्यानंतरच सागर तेथून गेला.

mayat sagar

रात्री अकरा वाजेच्या सुमारास सागर पाटील, त्याचा साथीदार पवन भंगाळे व इतर दोघे अशा चौघांची मद्यपानाची पंगत बसली होती. निंबाच्या झाडाखाली बसून या पंगतीच्या घटनेचे लाईव्ह आरिफ शहा अयुब शहा व त्याचा साथीदार जुबेर शेख भिका सिगलीकर हे दोघे बघत होते. रात्री बाराच्या ठोक्याला चौघा मित्रांच्या पंगतीचा समारोप झाला. पवन भंगाळे याने सागरला मोटार सायकलवर बसवून त्याच्या घराकडे नेले. मात्र काही वेळातच सागरच्या मनात काय आले कुणास ठाऊक? मद्यपान केल्यानंतर सुखासुखी आपल्या घराच्या दिशेने गेलेला सागर पुन्हा आरिफकडे चालत आला. तो आरिफच्या दिशेने नव्हे तर त्याच्या मृत्यूच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्याला माहीतच नव्हते. ते केवळ नियतीला ठाऊक होते.  

रात्र बरीच झाली होती. तरी देखील सागरने आरिफला मद्यपान करण्यासाठी सोबत येण्याचे जणू काही फर्मान सोडले. कधीही, केव्हाही मद्य मिळण्याचे एकमेव कुप्रसिद्ध ठिकाण असलेल्या कंजरवाड्यातून सागरने एक बिअरची बाटली आणली. याशिवाय त्याने त्याच्या घरातून दुसरी बिअरची बाटली देखील आणली. अशा प्रकारे दोन बिअरच्या बाटल्या जमल्यानंतर सागर, आरिफ आणि जुबेर असे तिघे जण कासमवाडी परिसरातील मासळी बाजारजवळ मद्यपान करण्यास बसले. तिघांनी मिळून बिअरच्या दोन बाटल्या रिचवल्या. त्यानंतर अगोदरच फुल चार्ज झालेला सागर अजूनच ओव्हरचार्ज झाला.

बेतापेक्षा जास्त चार्ज झालेल्या सागरने मद्याच्या नशेत आरिफला दहा हजार रुपये मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर शब्दामागे शब्द वाढत गेला. आरिफदेखील यावेळी सागरच्या पैसे मागणीमुळे त्रस्त झाला होता. त्याची पैशांची मागणी काही केल्या संपत नव्हती. अखेर आरिफची सहनशिलता संपली. मासळी बाजारातील एका दुकानदाराच्या ओट्याजवळ वाहनाच्या शॉकअपचा रॉड पडलेला होता. मासळी ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ फोडण्यासाठी तो रॉड वापरला जात होता. तो रॉड सागरच्या मृत्युसाठीच त्या रात्री त्याठिकाणी जणू काही पडलेला होता. ते विधीलिखीत होते. आरिफने तो रॉड उचलून सागरच्या डोक्यावर आठ ते नऊ वेळा सपासप मारला. अवजड शॉकअपचे डोक्यात वार झाल्यामुळे बिअरचा शेवटचा घोट घेत सागर जमीनीवर कोसळला. दरम्यान सागरच्या मोबाईलवर त्याच्या आईचे घरुन सारखे सारखे फोन येऊ लागले. जुबेरने ते कॉल कट करुन तो मोबाईल आरिफजवळ दिला. आरिफने तो मोबाईल पुन्हा सागरच्या खिशात ठेवून दिला.

आतापर्यंत मद्याच्या नशेत बरळणारा आणि दहा हजार रुपयांची मागणी करुन आरिफला जेरीस आणणारा सागर रक्ताच्या थारोळ्यात निपचीप पडला होता. त्याचे डोके फुटले होते. सागर जीवानिशी गेल्याचे बघून आरिफ व जुबेर या दोघांनी तेथून अजिंठा चौफुली गाठली. पळून जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नसल्याचे बघून दोघांनी रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणा-या रिक्षात बसून रेल्वे स्टेशन गाठले. मिळेल त्या रेल्वेने पळून जाण्याचा विचार दोघांनी केला. मात्र या कालावधीत रेल्वे नसल्याचे बघून दोघांनी पुन्हा रिक्षाने अजिंठा चौफुली गाठली. अजिंठा चौफुलीपासून दोघे एमआयडीसी परिसरातील भाजीपाला मार्केट पर्यंत पायी चालत आले. त्याठिकाणी दोघांनी काही वेळ घालवला. बघता बघता सकाळ होण्यास वेळ लागला नाही. वेळ घालवण्यासाठी दोघांनी शेरा चौकात येऊन सुरेशदादा कॉम्प्लेक्सच्या गच्चीवर जाऊन वेळ घालवला. त्यानंतर सकाळी पाच वाजता त्यांना महामार्गावर पाळधीच्या दिशेने जाणारी एक रिक्षा मिळाली. त्या रिक्षात बसून दोघे जण पाळधी येथे एका ढाब्यावर आले.  ढाब्यावरील एका टपरीवर दोघांनी चहा घेतली. त्यानंतर सकाळी आठ वाजता त्यांना धरणगाव येथे जाणारी एक लक्झरी बस मिळाली. त्या बसने दोघे धरणगावला गेले. धरणगावच्या मुख्य रस्त्यावरील चौकात पुतळ्याजवळ त्यांना लक्झरी बस चालकाने उतरवून दिले.  

दरम्यान इकडे जळगावला कासमवाडी परिसरातील घटनास्थळावर बघ्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. तरुणाची डोके ठेचून हत्या झाल्याची वार्ता परिसरात आणि शहरात पसरण्यास वेळ लागला नाही. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. दिपक चौधरी, राजेंद्र कांडेकर, पोलिस नाईक इमरान सैय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, गोविंदा पाटील, मुकेश पाटील व सचिन पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. सुधाकर अंभोरे, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक विजय शामराव पाटील, अविनाश देवरे, पो.कॉ. सचिन महाजन, पंकज शिंदे आदींनी घटनास्थळ गाठले.

सदर मृतदेह बघून तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार व यापुर्वी सन 2015 मधील  खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सागर वासुदेव पाटील असल्याचे निष्पन्न होण्यास वेळ लागला नाही. अशा प्रकारे मयताची ओळख पटली. त्याची हत्या कुणी व कशासाठी केली याचा उलगडा होणे गरजेचे होते. मयताची ओळख पटल्यानंतर खात्री करुन घेण्यासाठी मयत सागर पाटील याच्या आईला घटनास्थळी बोलावण्यात आले. त्याच्या आईने मृतदेह बघून तो आपलाच मुलगा सागर असल्याचे ओळखले. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद, सचिन पाटील, किशोर पाटील, गोविंदा पाटील, सुधीर साळवे आदींच्या पथकाने मयताला शेवटचे कुणी पाहिले? त्याच्यासोबत रात्री कोण कोण होते? आदींबाबत परिसरात चौकशी केली. या चौकशीअंती त्याचे मित्र आरिफ शहा अयुब शहा व त्याचा साथीदार जुबेर शेख भिका सिगलीकर या दोघांची नावे पुढे आली. याप्रकरणी मयत सागरची आई विमल पाटील यांच्या फिर्यादीनुसार सदर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 416/2022 भा.द.वि. 302, 34 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील फरार आरोपीतांचा शोध घेण्याचे काम  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने युद्ध पातळीवर सुरु केले. दरम्यान धरणगाव येथील आरिफची मामी बिल्कीस बी  मजीद यांच्याकडे बंगाली फाईल येथे दोघे आश्रयाला गेले. मात्र दोघे जण गुन्हा करुन आपल्याकडे आश्रयाला आल्याचे समजताच मामीने दोघांना त्यांच्याकडे राहण्यास विरोध केला. त्यामुळे दोघांनी मामीकडे पटापट जेवण करुन अमळनेर गाठले.

दरम्यान खबरी, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि सर्व तांत्रीक मदतीच्या आधारे माहिती घेत स्थानिक गुन्हे शाखेचा तपास वेगाने पुढे सरकत होता. दोघे जण अमळनेरला गेले असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजले. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हे.कॉ. सुधाकर अंभोरे, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक विजय शामराव पाटील, अविनाश देवरे, पो.कॉ. सचिन महाजन, पंकज शिंदे आदींनी अमळनेर शहर गाठले. अमळनेर शहरातील बुलढाणा अर्बन बॅंकेनजीक झाडाच्या सावलीत दोघे जण उभे असतांनाच त्यांच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेत एलसीबी पथकाने त्यांच्यावर शिताफीने झडप घालत त्यांना ताब्यात घेतले. अरे  दादा…… हमे क्यो पकड रहे हो…. हमने क्या किया असे म्हणत दोघे जण आपला बचाव करु लागले. मात्र पोलिस पथकापुढे त्यांचा फार वेळ निभाव लागू शकला नाही. अखेर त्यांनी आपला गुन्हा कबुल करत पथकापुढे शरणागती पत्करत स्वत:ला त्यांच्या स्वाधीन केले. दोघांना जळगावला आणल्यानंतर पुढील तपासकामी त्यांना एमआयडीसी पोलिस  स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आल्यानंतर अवघ्या आठ तासांच्या आत या गुन्ह्यातील दोघा संशयीत आरोपींना अटक करण्यात  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे व त्यांचे सहकारी हे.कॉ. राजेंद्र कांडेकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here