जळगाव : खरेदी केलेल्या घराची शासन दफ्तरी नोंद घेऊन तक्रारदारास ताबा पावती देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच मागणा-या उप निबंधक सहकारी संस्था जळगाव तालुका कार्यालयातील सहकार अधिकारी आणि सहायक सहकार अधिका-यांविरुद्ध एसीबी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. विजय सुरेशचंद्र गोसावी (54), सहकार अधिकारी, उप निबंध सहकारी संस्था, तालुका जळगांव वर्ग-3 -रा.प्लॉट नं.16, आशा बाबा नगर, जळगाव आणि चेतन सुधाकर राणे (48), सहाय्यक सहकार अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, रावेर प्रतिनियुक्ती उप निबंधक सहकारी संस्था, जळगांव तालुका वर्ग – 3 रा.गट नं.43, प्लॉट नं. 141, गणेश कॉलनी जवळ, जळगांव अशी एसीबीच्या कारवाईतील दोघांची नावे आहेत.
या घटनेतील तक्रारदाराने जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केले होते. सदर घराची सरकार दप्तरी नोंद घेवून त्याची ताबा पावती तक्रारदारास हवी होती. त्या ताबा पावतीच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे दोन्ही लोकसेवकांनी पंचासमक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. उप निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीवायएसपी शशीकांत पाटील यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.