अडीच लाख रुपये किमतीचे संशयास्पद रेशन धान्य जप्त

जळगाव : काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे रेशनचे संशयास्पद धान्य महसुल अधिका-यांच्या समक्ष पुढील कारवाईकामी जप्त करण्यात आले आहे. जळगाव शहरातील दुध फेडरेशन परिसरातील राजमालती नगरात काल सायंकाळी सदर कारवाई झाली. या कारवाईने रेशन धान्य दुकानदारांमधे खळबळ माजली आहे. रेशनचा गहू, तांदूळ व रिकाम्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वमुद्देमालाची अंदाजीत किंमत 2 लाख 48 हजार 500 रुपये फिर्यादीत नमुद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील दूध फेडरेशन नजीक राजमालती नगरात शासकिय स्वस्त धान्य दुकानातील गहु, तांदूळ एका ट्रकसह छोट्या मालवाहतूक गाडीत भरला जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना समजली. त्या माहितीच्या आधारे गुप्ता यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहन रोखून धरले. दरम्यान महसुलच्या स्थानिक सर्वोच्च पातळीवर फोनद्वारे त्यांनी माहिती दिली. सोबतच्या अंगरक्षकाच्या मदतीने माल भरल्यानंतर वाहन पळवून नेण्यापासून अटकाव करण्यात आला.

काही वेळाने तहसीलदार नामदेवराव पाटील, पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर जाधव, तहसिलदार कार्यालयातील महसुल नायब तहसिलदार विशाल सोनवणे व पुरवठा निरीक्षक जगदीश गुरव असे घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळावर टाटा कंपनीचा ट्रक (MH-06- AQ 2124) व एक अशोक लेलँड कंपनीची छोटी मालवाहतुक गाडी (MH 19 CY 6067) महसुल अधिका-यांच्या पथकाला आढळून आली. यावेळी दोन्ही वाहनांवरील चालक पळून गेले. पथक येण्यापुर्वी ट्रकमधे हमालांच्या मदतीने धान्य भरण्याचे काम पुर्ण झाले होते. ट्रक जाण्यासाठी रस्त्यातील वाहने हटवण्यात आली होती. मात्र धान्याने भरलेल्या वाहनांना गुप्ता व त्यांच्या अंगरक्षकाच्या मदतीने रोखून धरण्यात आले होते.

ट्रकमधे अंदाजे 180 ते 200 तांदळाने भरलेल्या गोण्या व दुस-या वाहनात 30 ते 35 गव्हाने भरलेल्या गोण्या होत्या. घटनास्थळावरील घराची, वाहनांची व धान्याची मालकी दाखवणा-या महेमुद बिस्मील्ला पटेल यास पुरेसा वेळ दिल्यानंतर देखील त्याने धान्याची बिले सादर केली नाही. सदर धान्याचा माल कोठून आणला व कोठे नेला जाणार होता याची माहिती दिली नाही. महेमुद पटेल या इसमाची पत्नी खान्देश महिला सोसायटी जळगांव येथील स्वस्त धान्य दुकानाच्या अध्यक्ष असल्याची माहिती पुढे आली. या सर्व संशयास्पद बाबी पाहता पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला. इतर वाहनचालकांच्या मदतीने दोन्ही वाहने पोलिस स्टेशनला आणून जमा करण्यात आली. पुढील कारवाई सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here