लातूर : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 91 वर्ष होते. या वयात देखिल त्यांनी कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावावर विजय मिळवला होता. कोरोनाच्या लढाईतून विजयी झालेले डॉ. निलंगेकर मात्र मृत्यूच्या लढाईत जिंकू शकले नाही. त्यांना रुग्णालयातील नॉन कोरोना वार्डात दोन दिवसांपुर्वीच दाखल केले होते. मात्र आज पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास किडनीच्या विकाराने त्यांचे पहाटे सव्वा दोन वाजता निधन झाले.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर आज निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. निलंगेकर हे सन 1985 ते 86 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अनेक खात्यांचे मंत्रीपद यशस्वीरित्या सांभाळले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुले व एक मुलगी तसेच नातवंडे असा परिवार आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे ते नातू होते.
संघर्षातून राजकीय वाटचाल करणारे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अतिशय शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला होता. भारत सरकारने त्यांचा स्वातंत्र्य सेनानी म्हणून गौरव केला होता. मात्र असे असले तरी त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणा-य सवलतींचा लाभ घेतला नव्हता. त्यांचे वय आणि पुर्वीचे आजार बघता त्यांची दवाखान्यात योग्य ती काळजी घेतली जात होती. य वयात देखील ते दवाखान्यात दैनिक वृत्तपत्र नियमीत वाचत होते.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा 16 जुलै रोजी लातूर येथील खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आला होता. त्यानंतर त्यांच्य परिवाराने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे दवाखान्यात दाखल केले होते. त्यांचे चिरंजीव प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील निलंगेकर हे देखील काही दिवस क्वारंटाईन झाले होते.