भुसावळ येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत वांजोळा रस्त्यावर 5 जून रोजी कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मयत तरुणाचा चेहरा पुर्णपणे कुजलेला होता. छातीचा केवळ सांगाडा तेवढा उरलेला होता. या मृतदेहाच्या अंगावरील पॅंट आणि जवळच पडलेली चप्पल या दोनच घटकांवर पुढील तपासाची दिशा ठरलेली होती. अशा अवघड परिस्थितीत या गुन्ह्यातील मयताची ओळख पटली व दोघा संशयीत आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर गुन्ह्याची माहिती दिली आहे.

रोहित दिलीप कोपरेकर (21) रा. रामदेवबाबा नगर भुसावळ असे मयताचे नाव असून राहुल राजेश नेहते रा. पाटील मळा, भुसावळ आणि सागर दगडू पाटील रा. पाण्याच्या टाकी जवळ खडका – भुसावळ असे अटकेतील दोघा संशयीत आरोपींची नावे आहेत. गुन्हा उघडकीस येण्यापुर्वी 2 जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल मिसींगमधील बेपत्ता तरुणाचे वर्णन या घटनेतील मयत तरुणाच्या पॅंट आणि चपलेसोबत मिळतेजुळते आढळून आले. त्यावरुन मयत हा रोहीत दिलीप केसरकर असल्याचे निष्पन्न झाले.

घटनास्थळाच्या दिसत्या परिस्थितीनुसार मयतास सुती दोरीने गळा आवळून डोक्यात दगड टाकून जीवे ठार केल्याचे प्रथम निष्पन्न झाले. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. अकस्मात मृत्यूच्या तपासाअंती अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 311 भा.द,.वि. 302, 201, 34 नुसार दाखल करण्यात आला.

बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पो. नि. राहुल गायकवाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपल्या सहका-यांच्या मदतीने पुढील तपासाला सुरुवात केली. घटनास्थळ परिसरातील हॉटेल व ढाब्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. वांजोळा रस्त्यावरील गब्बर हॉटेलवरील सीसीटीव्ही फुटेजमधे मयत आणि दोघे आरोपी मद्यपान करतांना आढळून आले. पुढील तपासात सागर पाटील यास डोंबीवली येथून तर राहुल नेहेते यास भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयाच्या चौफुलीवरुन अटक करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here