जळगाव : संस्था अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांच्या पतींनी प्राचार्य आणि संस्था अध्यक्ष यांच्या नावे असलेल्या बॅंकेच्या संयुक्त खात्याच्या स्वाक्षरी बदलाचा बनावट ठराव नकली कागदपत्रे जोडून केल्याच्या आरोपाखाली धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान्देश बहुउद्देशीय संस्था संचलीत कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी बांभोरी प्रचा ता. धरणगाव या शैक्षणिक संस्थेचे प्राचार्य सचिन भिमराव पाटील यांनी याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीच्या आधारे रतीलाल वना पाटील आणि विलास दत्तात्रय नायर या दोघांविरुद्ध सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे दोघेही संस्था अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पती आहेत.
भारतीय स्टेट बॅंक शाखा शिव कॉलनी जळगाव येथे या संस्थेचे खाते आहे. या खात्यात शासनाकडून प्राप्त होणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे जमा होतात. या शिष्यवृत्तीच्या रकमेवर नजर ठेवून हा ठराव केल्याचे उघडपणे म्हटले जात आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्राचार्य या तिघांपैकी कुणाही दोघांना संयुक्त व्यवहार करण्याबाबत स्वाक्षरी बदल करण्याबाबतचा संस्थेचा खोटा व बनावट ठराव तयार केला व सोबत नकली कागदपत्रे जोडून तो ठराव बॅंकेत सादर केल्याचा आरोप फिर्यादीत नमुद केला आहे. फिर्यादी प्राचार्य सचिन पाटील यांच्या मोबाईलवर या बदलाचा बॅंकेकडून संदेश आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
फिर्यादी प्राचार्य सचिन पाटील यांनी बॅंकेत जावून याबाबतचा तपास केला. बॅंकेत स्वाक्षरी नमुना कार्ड नवीन न घेता जुन्या कार्डावरच व्हाईस प्रेसीडेंट असा शिक्का मारुन उपाध्यक्ष पती विलास नायर यांनी स्वाक्षरी केल्याचे त्यांना दिसून आले. संस्थेचे उपाध्यक्ष पती विलास नायर यांनी स्वाक्षरी करुन संस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष पती असलेल्या दोघांनी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे एकुण 5 लाख 61 हजार रुपये बॅंक खात्यातून शासकीय रक्कम संगनमताने वर्ग करुन अपहार केल्याचे म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील करत आहेत.