जळगाव : भुसावळला जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेल्या बेपत्ता तरुणाचा घातपात झाला असल्याचे उघडकीस आले आहे. अटकेतील दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे.
भुषण तळेले हा मजुरीकाम करणारा तरुण 17 एप्रिल रोजी जळगाव नजीक रायपूर येथून आपल्या भाड्याच्या घरातून पत्नीला सांगून मोटार सायकलीने बाहेर गेला होता. त्यानंतर तो घरी आलाच नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने मिसींग दाखल केली होती. सदर मिसींगचा तपास हे.कॉ. गफुर तडवी, सिद्धेश्वर डापकर करत होते. दरम्यान बेपत्ता भुषणच्या पत्नीकडे असलेल्या मोबाईलवर दोन क्रमांकावरुन फोन येत होते. तो जीवंत आहे, तुम्ही काळजी करु नका. तो सुखरुप आहे लवकरच घरी येईल असे पलीकडून बोलणारी व्यक्ती सांगत होती. बेपत्ता भुषण हा कामाला जात असलेले ठेकेदार देखील त्याच्या पत्नीला येऊन भेटत होते. लवकरच तुमचा पती घरी परत येईल. तुम्ही घर सोडून जाऊ नका. नाहीतर मी आत्महत्या करेन असे उलट सुलट सांगून बेपत्ता भुषणच्या पत्नीची वेळोवेळी दिशाभुल केली जात होती. दरम्यान भुषणची मोटार सायकल रस्त्यावर मिळून आली होती. गाडीच्या जवळच चावी देखील पडलेली होती. चावीने डिक्की उघडून पाहिले असता त्यात भुषणचा मोबाईल होता. सर्वच प्रकार संशयास्पद होता.
अखेर भुषणच्या पत्नीने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून दोघा ठेकेदार संशयीतांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करत घातपाताचा संशय व्यक्त केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पो. हे. कॉ. गफुर तडवी व सिद्धेश्वर डापकर या दोघांनी दोघा संशयीतांना ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी दोघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
पोलिस उप निरीक्षक अनिस शेख यांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, गफुर तडवी, सुधीर साळवे, सिद्धेश्वर डापकर आदींनी दोघा आरोपींना सोबत घेत घातपाताचे घटनास्थळ असलेले मध्य प्रदेश गाठले. आरोपींनी भुषणची हत्या केलेले ठिकाण पोलिस पथकला दाखवले. नेपानगर तालुक्यातील झांजर गावाच्या पुढे बुरहानपुर – खंडवा रस्त्यावर तलावानजीक ते ठिकाण होते. या ठिकाणी दोघा आरोपींनी भुषण याच्या गुप्तांगावर मारहाण करुन त्याचा गळा दाबून हत्या केली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता तो पुर्णपणे कुजलेला होता. यावेळी हजर नातेवाईकांच्या अशृंचा बांध फुटण्यास वेळ लागला नाही. मयत भुषण याचे मुळगाव भातखेडा येथील असून ते घटनास्थळापासून सुमारे बारा किलोमीटर आहे. तसेच त्याचे सासर असलेले चांदणी हे गाव घटनास्थळापासून आठ किलोमीटर लांब आहे. या हत्येचा अधिक तपास सुरु आहे.