जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली या गावी चार घराचे कडीकोंडे तोडून घरफोडी तर दोन घरांचे कडीकोंडे तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
महेंद्र रामदास चव्हाण हे शिरसोली येथे भाड्याच्या घरात राहतात. त्यांची पत्नी माहेरी तर ते आईकडे दापोरा या गावी गेले होते. आपल्या घरी घरफोडी झाल्याचे समजताच ते सकाळी घरी परत आले. त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तुटलेले आढळून आले. घरातील सामान अस्ताव्यस्त झाले असल्याचे देखील त्यांना दिसून आले. त्यांच्या घरातून 40 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, 7 ग्रॅम वजनाचे 22 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे दागिने तसेच 50 हजार रुपये रोख असा ऐवज चोरीला गेल्याचे आढळून आले.
गावातील राजेंद्र रामा बारी यांच्या घरातील कपाटातून 15 हजार रुपये रोख चोरीला गेले आहेत. तसेच योगेश भिमराव देशमुख यांच्या घरातून 10 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत चोरीला गेली आहे. सपना रविंद्र गोंधळे यांच्या घरातील देखील सोने चोरीला गेल्याचे समजते. तसेच सुधीर भावराव पाटील व पुनमचंद विठ्ठल देवरे याच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस उप निरीक्षक अमोल मोरे पुढील तपास करत आहेत.