औरंगाबाद : चोरीच्या लोखंडी पाइप विक्रीतून आलेल्या चौदाशे रुपयांची तिघा चोरट्यांमधे हिस्से वाटणी न जुळल्याने झालेल्या वादातून दोघांनी एका अल्पवयीनाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिन दिवसांनी उघडकीस आलेल्या या घटनेतील मयत बालकाचा मृतदेह झुडूपात मिळून आला. युसुफ खान असदउल्ला खान रा. कैलास नगर असे सोळा वर्ष वय असलेल्या मयत बालकाचे नाव आहे. त्याची हत्या करणारे सय्यद आमिर सय्यद सलीम ऊर्फ चिरा (21), रा. दादा कॉलनी आणि फिरोज शेख युनूस शेख (26), रा. कैलासनगर औरंगाबाद अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
दोघा संशयीतांसह मयत अल्पवयीन बालक अशा तिघांनी मिळून एक लोखंडी पाईप चोरी करुन आणला होता. तो पाईप विक्री करुन त्याचे चौदाशे रुपये आले होते. तिघे जण मद्यप्राशन करत असतांना चौदाशे रुपयांच्या वाटणीवरुन त्यांच्यात वाद सुरु झाला. चौदाशे रुपयांचे समान तिन हिस्से जुळत नसल्याने व दहा रुपयांचा फरक पडत असल्याने वाद विकोपाला गेला. त्यात दोघांनी मिळून युसूफ खान याची रुमालाने गळा आवळून हत्या केली.
मयत युसुफच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे जिन्सी पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधे तो फिरोज आणि आमिर यांच्यासोबत पोलिसांना दिसून आला. त्याच्या सोबत असलेल्या फिरोज आणि आमिर यांना चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. घटनास्थळावरील झुडुपांमधे युसुफचा मृतदेह किड्यांनी व्यापलेला होता. कपडे विकून घर चालवणा-या वडीलांना मयत युसुफ हा मदत करत असे. गुन्हेगारांच्या संगतीत आलेल्या युसुफचा अशा प्रकारे मृत्यु झाला.