जळगाव : शेतजमीन खरेदी विक्रीच्या दाव्यातील निकालाच्या नकला देण्याकामी शासकीय फी व्यतिरिक्त पाचशे रुपये लाचेची मागणी करुन ती स्विकारणा-या कोषागार अव्वल कारकुणास एसीबीच्या पथकाने आज ताब्यात घेतले आहे. मुक्तार फकीरा तडवी (56) असे एसीबीच्या जाळ्यात सापडलेल्या यावल तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकुणाचे नाव आहे.
तक्रारदाराच्या वडीलांची मौजे मोहराळे शिवारात शेतजमीन आहे. त्या शेतजमीनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद सुरु होते. सदर वाद-विवादाबाबत तहसिलदार यावल यांचेकडे दावा दाखल करण्यात आला होता. सदर दाव्यामधील तहसिलदार यावल यांनी दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकला तक्रारदारास हव्या होत्या. या नकलांच्या शासकीय फी व्यतिरीक्त मुक्तार तडवी यांनी पंचासमक्ष पाचशे रुपयांची मागणी करत ती लाच स्विकारली. लाचेची रक्कम घेताच एसीबी पथकाने त्यांच्यावर झडप घालत त्यांना ताब्यात घेतले.
पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.