परराज्यातील पिता – पुत्र अट्टल मोबाईल चोरटे अटकेत

जळगाव : महाराष्ट्रासह इतर राज्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असलेले पिता पुत्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून अटक केले आहेत. त्यांना जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. कैलास श्रीबलराम लालवाणी (48) आणि सुमित कैलास लालवाणी (23) दोन्ही रा. वारसीया परीसर सिंधी कॉलनी, बडोदरा (गुजरात) अशी दोघा पिता पुत्रांची नावे आहेत.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील गुरुकृपा मोबाईल केअर या दुकानात 14 जून रोजी मोबाईल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोघा पिता पुत्रांनी 1 लाख 65 हजार 170 रुपये किमतीचे महागडे अकरा मोबाईल हॅंडसेट चोरी केले होते. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील दोघे आरोपी पिता पुत्र मुंबईच्या दिशेने रेल्वेने गेल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे दोघांना ताब्यात घेण्याकामी सहायक फौजदार रवि नरवाडे, स. फौ. युनूस शेख, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ संदिप पाटील, पोना, प्रविण मांडोळे आदींचे पथक याकामी रवाना करण्यात आले. लोहमार्ग पोलीस स्टेशन नाशिक व रेल्वे सुरक्षा बल नाशिक यांच्याशी संपर्क साधून दोघा पिता पुत्रांना नाशिक येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. दोघा आरोपीतांवर महात्मा गांधी रोड पोलीस स्टेशन इंदौर येथे गुरनं. 294/22 भादवि 379 प्रमाणे तसेच जोतपुर येथील उदय मंदीर पोलीस स्टेशन येथे देखील गुन्हे दाखल आहेत. त्यांनी अकोला, मुंबई, पुणे, कोटा अशा विविध शहरांमध्ये अशा प्रकारे मोबाईल चोरीचे गुन्हे केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here