जळगाव : महिलेसह तिच्या मुलाला पाच ते सहा अज्ञात इसमांनी मारहाण करुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेल्या 12 जून रोजी जळगाव शहरातील आर्कीड हॉस्पीटलनजीक घडली होती. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोघा आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या गुन्ह्यातील चौघे जण फरार असून पोलिस पथक त्यांच्या मागावर आहेत. आज सायंकाळी पोलिस अधिक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सदर माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व सायबर पोलिस स्टेशनचे पो.नि. लिलाधर कानडे आदी उपस्थित होते.
दि. 12 जून रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास जळगाव शहरात ऑर्किड हॉस्पीटलनजीक एका घरात पाच ते सहा अज्ञात आरोपी दरोडा टाकण्यासाठी आले होते. त्यावेळी फियांदी व फिर्यादीची आई घरात टी. व्ही. बघत होते. त्याचवेळी सुरुवातीला एक अनोळखी इसम व त्याचे इतर पाच साथीदारांनी फिर्यादीस मारहाण करुन त्याच्या आईला ओढून जमीनीवर पाडले होते. फिर्यादीच्या आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न करुन आलेल्या सर्वांनी फिर्यादीच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गु.र.नं. 436/ 2022 भादंवि 399, 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तयार करण्यात आली होती. तपासाअंती सागर जयंत पाटील (25) मुळ रा. कुसुंबा बु ता. रावेर ह.मु. श्री. अपार्टमेंट राम समर्थ कॉलनी, जळगाव यास सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा साथीदार प्रशांत शिवाजी पाटील (27) रा. मातोश्री नगर, धरणगाव याचे नाव पुढे आले. त्याला देखील ताब्यात घेण्यात आले. दोघांनी आपला गुन्हा कबुल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कमलेश प्रकाश सोनार रा. गाडगेबाबा नगर, पाचोरा, प्रमोद कैलास चौधरी रा. कळमसरा ता.पाचोरा, गोविंद शंकर पाटील रा.कळमसरा ता.पाचोरा, गणेश बाबुराव पाटील (धनगर) रा. शेंदुर्णी ता.जामनेर या सर्वांची नावे निष्पन्न झाली. दोघांव्यतिरिक्त चौघे फरार होण्यात यशस्वी झाले असले तरी पोलिस त्यांच्या मागावर असून लवकरच ते गजाआड केले जाणार असल्याचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी म्हटले आहे.
सागर जयंत पाटील हा बेरोजगार असुन त्यांच्याविरुद्ध यापुर्वी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला भादंवि 408, 420, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.आरोपी कमलेश प्रकाश सोनार याच्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला भादंवि 302, 397 प्रमाणे एक आणि भा.द.वि. 392, 201, 34 नुसार दुसरा गुन्हा दाखल आहे. प्रमोद कैलास चौधरी याच्याविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला भादंवि 392, 34 वाढीव कलम 395 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. अटकेतील दोघांना पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार आरोपीतांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.