जळगाव : स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे भासवून 88 वर्षाच्या जेष्ठ नागरिकाची 61 लाख 79 हजार 593 रुपयात फसवणूक करणा-या सात जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील 20 लाख 30 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. इतर दोघा फरार आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिकाराम शंकर भोळे हे सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक आहेत. नोव्हेंबर 2017 ते 25 ऑक्टोबर 2021 या कालावधीत त्यांच्या मोबाईलवर वेळोवेळी दिपक शर्मा, अनुराग शर्मा व कमलाकरन रेड्डी अशी नावे सांगणा-या व्यक्तींचे कॉल आले होते. स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमीटेड मधून बोलत असल्याचे सांगून त्यांनी भोळे यांचा विश्वास संपादन केला होता. या कंपनीची बनावट कागदपत्रे त्यांनी भोळे यांच्या घराच्या पत्त्यावर पाठवली. या पॉलीसीत रक्कम गुंतवल्यास आपल्याला चांगला परतावा मिळेल असे त्यांना पलीकडून बोलणा-या अनोळखी इसमांनी सांगितले. गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी पॅनकार्ड लिमीट वाढवणे, रकमेवरील बॅक कमीशन, शासकीय यंत्रणेकडून एनओसी मिळण्याच्या नावाने विविध कारणे सांगून टिकाराम भोळे यांना विविध बॅंक खात्यावर ऑनलाईन पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. भोळे यांनी एकुण 61 लाख 79 हजार 593 रुपये ऑनलाईन जमा केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे टिकाराम भोळे यांच्या लक्षात आले.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान फिर्यादी टिकाराम भोळे यांना आलेले ई-मेल, मोबाईल क्रमांक, बँक खाते, सीसीटीव्ही फुटेज, तसेच इतर तांत्रिक बाबींचे विश्लेषन करुन तपासाला गती देण्यात आली. सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी दि. 27 डिसेंबर 2021 रोजी पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाने, पोहेकॉ राजेश चौधरी, पोहेकॉ प्रविण वाघ, पोना दिलीप चिंचोले, पोना सचिन सोनवणे, पो.कॉ. गौरव पाटील, पोकॉ दिपक सोनवणे, पोकॉ श्रीकांत चव्हाण, पोकॉ पंकज वराडे, महिला पोकॉ उज्वला माळी यांचे पथक दिल्ली व उत्तरप्रदेश येथे तपासकामी रवाना केले. तपासादरम्यान गाझीयाबाद, नोएडा, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील अमित सिंग पिता देवेंद्र प्रकाश सिंग रा. 1/1911 मोतीराम रोड, मानसरोवर पार्क, शाहदरा नार्थ ईस्ट दिल्ली, लखमीचंद पिता राजेश कुमार, रा. बी- 2/50 गल्ली नंबर 12, जोहरी पुर, दिल्ली, दिपेश कुमार पिता तारकेश्वर सिंग, रा. प्लॉट न.सी-1/12 तिसरा मजला इन्क्लेव्ह, नवी दिल्ली, अमीत वर्मा पिता रामसिंग वर्मा उर्फ विक्रम पिता सुरेश, रा. ए 87, सेक्टर 2, नोएडा, उत्तर प्रदेश, राजकुमार पिता कल्याण सिंग ऊर्फ अनुराग शर्मा, रा. राधा कॉलनी लालकुआ, गाजियाबाद उत्तर प्रदेश, रविकुमार पिता यशपाल सिंग ऊर्फ कमलाकर रेड्डी, रा. जलालपुर गौतमबुध्द नगर, उत्तर प्रदेश, सोनी यादव पिता कृष्णेंद्रकुमार यादव, रा-दिल्ली, अशा सर्वांना अटक करण्यात आली. त्यांच्या कब्जातून गुन्हयातील फसवणुकीची 20 लाख 30 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली. फरार आरोपी अक्षय यादव पिता कृष्णेंद्रकुमार यादव, रा-दिल्ली यांच्या वेगवेगळया बँक खात्यातून 13 लाख 62 हजाराची रक्कम गोठवण्यात आली आहे. याशिवाय दुसरा फरार आरोपी रिटा सहाणी रा. दिल्ली याचा देखील शोध सुरु आहे.