पुसद : पुसद शहर पोलिस स्टेशन हद्दीत लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी असलेल्या हेड कॉन्स्टेबलने लोखंडी गजाला लुंगी बांधून आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणल्याचे उघड झाले आहे. 17 जून रोजी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने पोलिस दलात खळबळ माजली आहे. विष्णू सखाराम कोरडे (53) असे मरण पावलेल्या पोलिसाचे नाव आहे.
आत्महत्येपुर्वी मयत हेड कॉन्स्टेबल कोरडे यांनी थेट पोलिस अधिक्षकांवरच आरोप करत दोन पानी पत्र लिहून ठेवले. आपल्या मृत्यूला पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ हेच जबाबदार असल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षकांनी पत्नीसमोर केलेला अपमान आणि वेळोवेळी दिलेली वागणुक या प्रकाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हेड कॉन्स्टेंबल विष्णू कोरडे हे 17 जून रोजी सकाळी पाच वाजता नेहमीप्रमाणे घराच्या गच्चीवर व्यायामासाठी गेले होते. बराच वेळ झाला तरी ते खाली आले नाही. त्यांना बघण्यासाठी घरातील सदस्य गेले. त्यावेळी गच्चीवर जाणा-या पायरीच्या गजाला लुंगीच्या मदतीने लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.