जळगाव : दोन महिन्याच्या बालिकेला विहीरीत फेकून दिल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. जितेंद्र उर्फ नाना जंगल ठाकरे रा. कराव ता. भडगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील तपासकामी भडगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
18 जून 2022 रोजी भडगाव तालुक्यातील काकनबर्डी येथे धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रम झाल्यानंतर घरी आलेल्या जितेंद्र ठाकरे याचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला होता. या वादातून त्याने दोन वर्षाची त्याची खुशी नावाच्या मुलीला सोबत घेत ची जंगलाच्या दिशेने धाव घेतली होती. वाटेत शेतातील एका विहीरीत त्याने मुलगी खुशी हिस फेकून दिले होते.
सदर घटना गावक-यांच्या लक्षात आल्याने त्याने स्वत: विहीरीत उडी मारली होती. मात्र गावक-यांच्या सतर्कतेने त्याला बाहेर काढण्यात आले होते. त्याची मुलगी या घटनेत मृत्युमुखी पडली होती. गावक-यांनी त्याला भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याने पलायन केले होते. त्याच्या विरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा पाचोरा येथे असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेकाँ लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर ममराज राठोड, पोना रणजीत अशोक जाधव, पोकाँ विनोद सुभाष पाटील, पो. काँ. ईश्वर पाटील आदींनी त्याला पाचोरा येथून शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला पुढील तपासकामी भडगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.