जळगाव : रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील पत्रकार कमलाकर माळी यांचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने नाशिक येथील कालिदास कलामंदीर सभागृहात त्यांना हा पुरस्कार तसेच सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ भेट देण्यात आले.
कमलाकर माळी यांनी ते रहात असलेल्या वाघोदा गावी मोफत नेत्र शिबीर, रक्तदान शिबिर, गाव फलक, वाचनालय आदींची सोय केली आहे. याशिवाय कोविड कालावधीत त्यांनी मोफत मास्क वितरण केले. व्हाटसअॅप गृपच्या माध्यमातून ते विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कामगार नेते संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कोठावदे, पर्यटन उद्योजक शबनम खान, योग पंडित डॉ. पूनम बिरारी, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, प्रज्ञा कांबळे, वासुदेव काळे आदी उपस्थित होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी यावेळी प्रास्ताविक केले.