जळगाव : दारु पिण्यासाठी कामगारांनी पैसे दिले नाही म्हणून संतापात फॅक्ट्रीला लावलेल्या आगीत चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बोदवड येथील या घटनेत मसाले फॅंक्ट्रीतील मिरची धने, हळद, खडा गरम मसाला पावडर, 24 टन सुखी मिरची, मशिनरी, सीसीटीव्ही कॅमेरे आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
बोदवड येथील खंडेलवाल पेट्रोल पंपाच्या मागे देवराम माळी यांची लक्ष्मी मसाले फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीतील कामगारांनी पवन इश्वर माळी यास दारु पिण्यास पैसे दिले नाही. त्यामुळे संतापाच्या भरात त्याने फॅक्ट्रीत आग लावून दिली. या आगीत सुमारे चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी बोदवड पोलिस स्टेशनला पवन माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन माळी यास अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार सुधाकर शेजोळे करत आहेत.