जळगाव : रामेश्वर कॉलनी, मेहरुण परिसरात एकाच रात्री मोबाईल चोरीच्या चार घटना घडल्या होत्या. या चार घटनांमधे चौघांच्या घरातून एकुण सहा मोबाईल चोरी झाले होते. 20 जूनच्या रात्री घडलेल्या या चोरीच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला राहुल शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या चोरीच्या तपासात पो. नि. प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीनुसार योगेश राजेंद्र चौधरी रा. आदित्य चौक रामेश्वर कॉलनी, मेहरुण – जळगाव व सुधीर सुभाष भोई रा. साईबाबा मंदिराजवळ, एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण – जळगाव या दोघांना एरंडोल येथून अटक करण्यात आली आहे. पो. नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, नाना तायडे, मुकेश पाटील व साईनाथ मुंढे आदींनी या तपासात सहभाग घेतला. अटकेतील दोघांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यांनी चोरी केलेले मोबाईल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. दोघांना न्या. आय. वाय. खंडाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 27 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटकेतील योगेश चौधरी याच्याविरुद्ध यापुर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.