नगर : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी स.पो.नि. रवींद्र पिंगळे यांना व्हाट्सअॅपसह टेक्स्ट मेसेज पाठवून शिवीगाळ, दमदाटी करणार्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. सुनिल शिंदे (32) रा. बदलापूर ईस्ट, मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सुनिल शिंदे याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला विनयभंग, आर्म अॅक्ट अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे तत्कालीन स.पो.नि. रविंद्र पिंगळे यांच्याकडे होता. दरम्यानच्या कालावधीत 28 ऑगस्ट 2021 रोजी सुनिल शिंदे याने स.पो.नि. पिंगळे यांना व्हाट्सअॅप वर टेक्स मेसेज पाठवले होते. गुन्ह्यात मदत केली नाही तर तु आतापर्यंत किती भ्रष्टचार केला आहे, ते सर्व बाहेर काढेल असे मेसेजच्या माध्यमातून म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली होती. स.पो.नि.पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून शिंदे फरार होता. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार शैलेश गोमसाळे, गौतम सातपुते, दत्तात्रय जपे यांच्या पथकाने फरार आरोपी शिंदे यास मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गडकरी करत आहेत.