कन्नड : पैसे दुप्पट करून देतो या आमिषाला बळी पडलेल्या अद्रक व्यापा-याची चार लाख रुपयांची बॅग पळवून नेण्याप्रकरणी कन्नड शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानुदास काशिनाथ मगर रा. हिवरखेडा (नां.) ह. मु. चंद्रलोकनगरी, कन्नड असे फसवणूक झालेल्या अद्रक व्यापा-याचे नाव आहे. संदीप पवार हा बहिरगाव येथील अद्रकचा व्यापारी आहे.
त्यामुळे दोघांची ओळख झाली होती. काही दिवसांपुर्वी संदीप पवारच्या आईने भानुदास मगर यास घरी बोलावले. त्याला एका महाराजाचा मोबाईल नंबर तिने दिला. एक लाख रुपये जमा केले तर तो महाराज दुप्पट पैसे करून देतो असे त्याला सांगण्यात आले. झालेल्या संभाषणानुसार भानुदास यास बुधवारी सायंकाळी महाराजांनी अण्णाभाऊ साठे चौकात बोलावले. त्या ठिकाणी त्याची कथीत महाराजसोबत भेट झाली.
महाराज त्यावेळी अनोळखी व्यक्तीसह मोटारसायकलवर आला होता. त्याने एक मीटर कोरा कापड घेण्यास सांगितले. त्यावर हळद कुंकू टाकुन ५०० रुपये दराच्या ८०० नोटा बॅगमध्ये भरुन तिघेही थांबले. त्याच वेळी फोनवर बोलत असतांना भानुदास मगर यांचे लक्ष चुकवून मोटारसायकलला अडकवलेली चार लाख रुपयांची बॅग लंपास करत महाराज त्याच्या साथीदारासह फरार झाला. या प्रकरणी भानुदास मगर यांच्या तक्रारीवरून दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.नि. रामेश्वर रेंगे व त्यांचे सहकारी करत आहेत.