जळगाव : अज्ञात माथेफिरुने जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत एका जणाची कार जाळली तर दुस-याची कार जाळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घटनेत दोघांच्या कारचे नुकसान झाले आहे. चारचाकी वाहन जाळून टाकल्यानंतर दोघा कारमालकांच्या अंगणात हिंदी भाषेत धमकीची चिठ्ठी खाकी रंगाच्या पाकीटात ठेवण्याचा प्रकार अज्ञाताने केला आहे. दोन दिवसात दहा लाख रुपये खंडणीची रक्कम मिळण्याची मागणी या चिठ्ठीतून करण्यात आली आहे.
निमखेडी शिवारातील रहिवासी हरिष वसंतराव वरुडकर यांची मारुती कंपनीची वॅगनर आर कार 28 व 29 जूनच्या दरम्यान रात्रीच्या वेळी कुणीतरी जाळून टाकली आहे. तसेच त्यांच्या घरासमोर राहणारे आनंदा युवराज पाटील यांची बलेनो कंपनीची कार आग लावून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. चिठ्ठीच्या माध्यमातून दोघांच्या कुटूंबांना मारण्याची धमकी व दहा लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गणेश सायकर करत आहेत.