जळगाव : जयहिंद सर ……….असे डायल 112 वर कार्यरत अंमलदाराने फोन उचलून पलीकडून बोलणा-या व्यक्तिला “मी आपली काय मदत करु शकतो” असे विचारले. मेहरुण तलावावर एक महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पलीकडून बोलणा-या व्यक्तीने फोनवर कथन केले. पलीकडून बोलणा-या व्यक्तीने दिलेली माहिती गंभीर होती. त्यामुळे डायल 112 हा क्रमांक अटेंड करणारा पोलिस कर्मचारी राहुल चंद्रकांत रगडे यांनी लागलीच या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस कर्मचारी राहुल रगडे व एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या इतर कर्मचा-यांनी मेहरुण तलावाचे घटनास्थळ गाठले. त्याठिकाणी एक महिला पाण्यात जीव देण्याच्या तयारीत होती. तिला काही नागरिक विरोध करत होते. लीला पार्क – आयोध्या नगर परिसरातील महिला घरगुती कारणावरुन त्रस्त झाल्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बघून पोलिस कर्मचा-यांनी तिला रोखले.
कधी भावनिक होऊन तर कधी रागावून तर मधेच तिला प्रेमाने समजावून पोलिस कर्मचारी वर्गाने तिची मनधरणी करत समजूत घातली. हा प्रकार जवळपास एक ते दिड तास सुरु होता. दरम्यानच्या कालावधीत तिच्या पतीला फोन करुन बोलावण्यात आले. तिची समजूत घालत असतांना तिला तलावाच्या काठावरुन मोकळ्या जागी आणण्यात पोलिसांना बरेच यश आले होते. अखेर तिची समजूत घालण्यासह तिला तिच्या पतीच्या ताब्यात देण्यात पोलिस कर्मचारी राहुल रगडे यांच्यासह इतर सर्व कर्मचारी वर्गाला यश आले. डायल 112 व राहुल रगडे यांचे प्रयत्न सफल झाले.