संघर्ष तसा या राज्याच्या पाचवीलाच पुजलेला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी घनघोर संघर्ष झाला . 105 हुतात्मे झाले. हट्टाला पेटलेल्या दिल्लीश्वरांशी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी भूमीने तेव्हा हार मानली नाही. “शूट अॅट साईट” ऑर्डरला कुणीच घाबरले नाही. शेवटी पेटून उठलेल्या मराठी -अमराठी माणसांच्या लढ्याला यश आले. तत्पूर्वी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयनांना पाण्यात पाहणारांचे “आचार्य अत्रे”सह अनेकांनी भरपूर वस्त्रहरण केले. व्यंगचित्राद्वारे “शिवांबु” पाजले. काळ पुढे सरकला. 62 वर्ष उलटली. तरी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कैदेत टाकण्याचे उद्योग अद्याप थांबलेले नाही. असेच राज्यातील सत्तांतर महानाट्याबद्दल बोलले जात आहे.
लोकांना काय….. काहीही बोलतात. कुणी म्हटलेच आहे – “सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग?” अडीच वर्षापासून शिवसेनेने मतदानाचा कौल झिडकारला. अनैतिक आघाडी वगैरे रेकॉर्ड वाजली. रिमोट कंट्रोलवर चालणा-या पक्षातच बंडाळी झाली. “ते” गेले..नव्हे घालवले गेले. “हे” …आले. बंडखोर आनंदले. भाजपवाले जल्लोषात नाचले. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारच हे गृहीतक सायंकाळी बदलले. फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती घोषित केली. आपण सरकार बाहेर राहणार हेही त्यांनी घोषित केले. तासाभरात त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्याचा आदेश झाला. तसे घडले. मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांना बसवल्याचा जेवढा धक्का बसला त्याच्या कित्येक पट फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा आदेश आल्याचा धक्का राज्याला बसला.
राजकारण असेच असते. धक्कातंत्र नवे नाही. अंदाज – गृहितक – समीकरणे -शक्यता – अशक्यता – नशिब – छल – कपट – डावपेच – फंदफितुरी – भेदाभेद -घरभेदीपणा असा सारा मसाला “राजकारण” पण या पाच अक्षरात सामावल्याचे म्हणतात. एखाद्या मावळत्याने उगवत्याचा सत्ताभिषेक करावा हे आम्हास नवे नाही. सन 1974 – 75 नंतर मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना पद सोडण्याचा आदेश आला. दिल्लीहून आलेल्या दूताने आणलेल्या बंद पाकिटात असलेले नव्या नेत्याचे नाव शंकरराव चव्हाण यांनाच जाहीर करायला लावले. कठोर शिस्तीचे शंकरराव पायउतार होताहेत हे बघून नेता निवडीच्या वेळी जल्लोष झाला. या घोषणावीरांना दूताने क्षणात दणका दिला. आपल्या शंकररावांना रात्रीच दिल्लीस नेतोय. उद्या त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून शपथविधी आहे. हे चव्हाण बनले केंद्रीय गृहमंत्री. तरीही 1962 नंतर केंद्रीय संरक्षण मंत्री बनलेल्या महाराष्ट्राचे थोरले साहेब यशवंतराव चव्हाण यांचा काँग्रेसवर पोलादी पकड असलेल्यांनी कसा पाणउतारा केला तेही महाराष्ट्राने पाहिले. महाराष्ट्राच्या मराठी मातीतला कोणताही बलाढ्य नेता पंतप्रधान पदापर्यंत अजिबात येता कामा नये याचा चोख बंदोबस्त दिल्ली करते असे राजकीय निरीक्षकांचे कायम म्हणणे ऐकू येतेय. फार दूर कशाला? स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी आणि राजीव गांधी या दोघांच्या हत्येनंतर तेव्हा काँग्रेसमध्ये ज्येष्ठतम म्हणून शरद पवार होते. महाराष्ट्राचे 11 नेते दिल्लीत विविध पदावर सत्तारुढ होते. पण त्यांची अकरा तोंडे अकरा दिशेला. पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती उसळी मारतेच. हिच प्रवृत्ती यशवंतरावांपासून महाराष्ट्राच्या आजवरच्या सुशील कुमार शिंदे, शरद पवार, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेकांना बाधक ठरत आली आहे.
नरसिंह राव यांच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा होती. तेव्हा काँग्रेस पक्षीय निवडणुकीत शरद पवार, तारीक अन्वर सरचिटणीसपदी जिंकले. नरसिंह रावांनी त्यांची निवड रद्द केली. पुन्हा त्याच पदावर नियुक्ती दिली. म्हणजे “यू आर नॉट ईलेक्टेड – सिलेक्टेड” हाच दिल्लीचा खाक्या. बुद्धिबळाच्या खेळात खेळाडू समोरच्याची “चाल” बघतो. प्यादी, घोडा, हत्ती, उंट, वजीर कशा पद्धतीने पुढे येतात ते बघतात. वजीरासह किंग संपवू पाहणारे स्पर्धक राजकारणातही आव्हान उभे करण्याआधीच किंवा स्पर्धक म्हणून उभे राहण्यापूर्वीच रोखण्याचा खेळ चालतो असे म्हणतात. अस्मादिकासह लक्षावधी लोक पत्ते, बुद्धीबळ या खेळात “ढ” आहेत. राजकारण हा प्रकारच थोरामोठ्यांचा प्रांत. त्यात मात्र येथल्या मातब्बर पुढार्यांचे महाराष्ट्राबाहेर मित्रांचे संख्याबळाचा दुष्काळ. महाराष्ट्रातले सगळे वर्णव्यवस्था – समाजवार रचना यात गुंतलेले. त्यातही ब्राह्मण – बनिया – ओबीसी – मराठा आरक्षण वाले – हिंदू-मुस्लीम, ख्रिश्चन, जैन आर्य – अनार्य, अठरापगड जाती जमातीची उतरंड राजकीय सोयीप्रमाणे वापरण्याचा प्रघात आहेच. यावेळी फडणवीस ब्राह्मण असल्याने त्यांचे मुख्यमंत्रीपद थांबवण्यात आल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मराठा व्यक्तिमत्व आणल्याचा आनंद वेगळाच. पण यावेळी या सत्तांतरात फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करुन फार मोठा “त्याग” केल्याचे म्हणण्यात काही अर्थ नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यापेक्षा फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवण्याचा आदेश हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचा मुद्दा भावी काळात गाजणार असे दिसते.
महाराष्ट्राच्या राजकारणात कर्तृत्व गाजवून दिल्ली म्हणजे केंद्रीय राजकारणात मोठी झेप घेण्याची क्षमता असलेल्या मराठी नेत्यांचे प्रतिमा भंजन योजनाबद्धरित्या केले जाते. त्यांच्या वाटेत काटे टाकले जातात. नितीन गडकरी यांना भाषण करताना भोवळ येत असल्याची दृश्य वारंवार दाखवली जातात. राजकारणातल्या चर्चेनुसार 51 वर्षाचे देवेंद्र फडणवीस हे भावी पंतप्रधान होऊ शकतात असे बहुसंख्यांना वाटते. शिवाय ज्येष्ठत्वाच्या वाटेवरील अनुभव समृद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून शरद पवार हे देखील पंतप्रधान पदावर जाऊ शकतात. परंतु या शक्यता राजकीय पटलावर मांडल्या जाण्यापूर्वीच त्यांच्या प्रतिमा भंजनाचा खेळ होतो. खोट्या आरोपांचा पाऊस पाडला जातो. भ्रष्टाचारासह अनेक प्रकारचे आरोप, चौकशी यांचा ससेमिरा लागतो असे अनेकांना वाटते. ही सारी आयुधे वापरुन राजकारण खेळले जाते. पौराणिक कथांनुसार कुण्या अगस्त नामक ऋषी महोदयांनी एक संपूर्ण सागर प्राशन केला होता. सांप्रतचा घटनाक्रम देवेंद्र यांच्या अपमान रुपी महासागर प्राशनाची सुधारित आवृत्ती म्हटली जाऊ शकते. देवेंद्र फडणवीस असो की उद्धव ठाकरे, दोघांचे पक्ष वेगळे. दोघांचे कार्य वेगळे. कोणी पित्याच्या पुण्याईवर सत्तेची कामना करतो. महाराष्ट्राला भावनेच्या पाकात बुडवून कुणाला सत्ता हवी असते. मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार बनले तरी काहींना महानगरपालिका, जिल्हा परिषद, साखर लॉबी, लिकर लॉबी, रियल इस्टेट लॉबी, बँकांचीही सत्ता हवीच असते. या संस्थांची मिळवलेली सत्ता सोडवत नाही. माझेही माझेच व तुझेही माझेच मुकाट्याने द्या अन्यथा हिसकून घेऊ म्हणतात. प्राचीन इतिहासात डोकावले तर बलदंड राजे शेजारचे प्रदेश जिंकून तेथे मांडलिक राजे बसवत. जहागीरदार, मनसबदार, वतनदार नियुक्त करीत. त्याच खेळाची नवी आवृत्ती रेखाटण्यासाठी महाराष्ट्रीयनांचा तेजोभंगाचा नवा अध्याय तर रचला जात नाही ना अशी शंका लोकांमधून बोलली जाते.