पुणे : निगडी परिसरात एका सोनोग्राफी सेंटरवरील कारवाई टाळण्याच्या बदल्यात सुरुवातीला पाच लाख व नंतर तडजोडीअंती दोन लाख रुपयांची लाच स्विकारणा-या महिला सहायक पोलिस निरीक्षकास गुरुवारी रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. नलिनी शिंदे (34) असे सदर महिला सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी लाचेची रक्कम घेतांना पुणे एसीबी पथकाने ताब्यातील नलिनी शिंदे हिस शुक्रवारी न्यायालयात हजर केले.
नलिनी शिंदे सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक कार्यालयात महिला अत्याचार व निवारण कक्षात कार्यरत आहे. मालवण पोलिस स्टेशनला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार एक गुन्हा दाखल असून या गुन्ह्याच्या तपासकामी नलिनी शिंदे निगडी येथील दवाखान्यात आल्या होत्या. सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासह तपासात सहकार्य करण्यासाठी महिला डॉक्टरकडे सुरुवातीला पाच लाखाची व तडजोडीअंती दोन लाखांची मागणी नलिनी शिंदे कडून करण्यात आली होती. याप्रकरणी 62 वर्षाच्या डॉक्टरने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.