जळगाव : मोबाईल हिसकावण्याचे गुन्हे करणा-या एकास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. युसुफ शेख उर्फ चिल्या इसा शेख असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल स्नॅचिंगचा गुन्हा अटकेतील युसुफ शेख याच्याकडून उघडकीस आला असून त्याच्या ताब्यातून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
जळगाव शहरात दिवसेंदिवस मोबाईल, महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावण्यासह चो-या – घरफोड्यांचे गुन्हे वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभुमीवर गुन्हे प्रकटीकरणासाठी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना सुचना दिल्या आहेत.
युसुफ शेख उर्फ चिल्या रा. शिवाजी नगर हुडको – जळगाव व त्याच्या साथीदारांनी जळगाव शहरात मोबाईल स्नॅचींगचे गुन्हे केले असून ते शिवाजी नगर भागात रहात असल्याची माहिती पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे मोबाईल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासकामी एक पथक तयार करण्यात आले. या पथकात पोहेकॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बावीस्कर, राहुल पाटील आदींचा समावेश करण्यात आला. या पथकाने आपल्या खब-यांच्या मदतीने माहिती घेत आरोपी युसुफ शेख उर्फ चिल्या इसा शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने आपण मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे त्याने कबुल केले. त्याच्या ताब्यातून मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्याला पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.