औरंगाबाद : राज ठाकरे यांना बघण्यासह त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या मनसे पदाधिका-याची 20 तोळे वजनाची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी शिताफीने लंपास केली होती. या घटनेप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास लागला असून दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातील सोन्याची चेन देखील हस्तगत करण्यात आली आहे. दत्ता श्रीमंत जाधव (25) आणि उमेश सत्यभान टल्ले (35), दोघेही रा. गांधीनगर झोपडपट्टी, पेठ बीड अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ याठिकाणी सभा झाली होती. या सभेला राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत नांदेड येथून आलेले मनसे पदाधिकारी मनिंदरसिंग ऊर्फ मोंटीसिंग धरमसिंग जहागीरदार हे आले होते. ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या व्हीआयपी गेटवर उभे असतांना रात्री आठच्या सुमारास राज ठाकरे यांचे जल्लोषात आगमन झाले. त्या वेळी प्रवेशद्वारावर झालेल्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मनिंदरसिंग यांच्या गळ्यातील विस तोळे वजनाची सोन्याची चेन लंपास केली होती.
सिटी चौक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत बीड येथील दत्ता श्रीमंत जाधव (25) आणि उमेश सत्यभान टल्ले (35), दोघेही रा. गांधीनगर झोपडपट्टी, पेठ बीड या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दत्ता जाधव यास पुणे येथून तर उमेश टल्ले यास बीड येथून ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या पथकातील स.पो.नि. अशोक भंडारे, उपनिरीक्षक कल्याण चाबुकस्वार, जमादार विलास काळे, देशराज मोरे, अभिजित गायकवाड आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.