तिन खून पचल्याचा आनंदात मुकुंदा होता मोकाट– चपलेवरुन उघडकीस आलेला तपास झाला सुसाट

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : मुकुंदा ऊर्फ बाळू बाबुलाल लोहार यास अल्पवयातच झन्ना मन्ना जुगार खेळण्याचा नाद लागला होता. हाती आलेले पैसे तो चोपडा, शिरपुर परिसरात जावून जुगार खेळण्यात उडवून देत असे. जुगारात पैसे हरल्यानंतर पुन्हा कुठून तरी तात्काळ पैसे उपलब्ध करण्यासाठी तो प्रयत्न करत असे. यावल तालुक्यातील किनगाव येथील मुकुंदा लोहार यास जुगाराचा नाद स्वस्थ बसू देत नव्हता. वेल्डींगच्या दुकानावर तो काम करत असे.

सन 2021 मधे कोरोनाची लाट पसरली होती. प्रत्येकाला आर्थिक टंचाई आली होती. तशी मुकुंदा लोहार याला देखील आर्थिक चणचण भासत होती. त्याच कालावधीत त्याची नजर द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे या 70 वर्ष वयाच्या वृद्ध महिलेवर पडली. 70 वर्ष वयाची द्वारकाबाई किनगाव येथे एकटीच रहात होती. द्वारकाबाईला पती निधनानंतर सरकारी पेन्शन मिळत होते. त्यामुळे तिला फारशी आर्थिक चणचण नव्हती. मुकुंदा लोहार याने ही बाब हेरली होती.  वयोवृद्ध द्वारकाबाईला ठार केल्यास तिच्याजवळ असलेली पेन्शनची रक्कम आपल्याला हडप करता येईल असा कुविचार मुकुंदा लोहार याच्या मनात चमकून गेला. द्वारकाबाईच्या अंगावर देखील दागिने रहात होते. तिला ठार केल्यास तिचे अंगावरील दागिने देखील आपल्याला मिळतील हे लक्षात घेत त्याने तिला ठार करण्याचे नियोजन केले. तो तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होता. ती एकटीच रहात असल्यामुळे तिच्या बचावासाठी कुणी येणार नाही याची त्याला कल्पना आली होती. तिचा मुलगा जळगाव येथे रहात असल्याचे देखील त्याने माहिती करुन घेतले होते.

28 फेब्रुवारी 2021 रोजी अचानक किनगाव येथील विज पुरवठा खंडीत झाला. विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे संपुर्ण किनगाव परिसरात अंधार पसरला. या अंधाराचा गैरफायदा घेत त्याने वयोवृद्ध द्वारकाबाईच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी रात्री सात ते आठचा सुमार होता. घरात गेल्यावर त्याने द्वारकाबाईचा रुमालाने गळा आवळण्यास सुरुवात केली. तिने तिच्या क्षमतेनुसार मुकुंदा लोहार याच्याशी प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मात्र त्याच्या ताकदीपुढे वयोवृद्ध द्वारकाबाईचा प्रतिकार कमी पडला. काही वेळातच तिने आपले प्राण सोडले. या झटापटीत ती मयत अवस्थेत घरातील संडास बाथरुमच्या मधे पडली. तिच्या चेह-यावर मुकुंदाने ओरबाडल्याच्या खुणा तयार झाल्या होत्या. तिच्या डोक्यास मागील बाजूस मार लागल्याने त्यातून रक्त निघत होते. झटापटीत जवळच भिंतीवरील इलेक्ट्रीकचा बोर्ड तुटून पडला होता. द्वारकाबाई मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुकुंदाने द्वारकाबाईच्या गळ्यातील पट्टा, सोन्याची पोत, कानातील सोन्याच्या बाळ्या, लोखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यातील पैसे आदी चिजवस्तू काढून घेत अंधारातच तेथून पलायन केले.

दुस-या दिवशी सकाळी या घटनेची माहिती परिसरातील लोकांना समजली. त्यांनी मयत द्वारकाबाईचा जळगाव येथे राहणारा मुलगा सुरेश चैत्राम सुरवाडे यास सदर घटनेची माहिती कळवली. द्वारकाबाईची कुणीतरी अज्ञात इसमाने दागिन्यांसाठी हत्या केल्याचा संशय घटनास्थळावर उपस्थित नातेवाईकांच्या मनात बळावला. मात्र त्यावेळी कोरोनाची साथ वेगाने सुरु होती. कोरोनाचा सर्वत्र कहर असल्यामुळे कुणीही या घटनेची पोलिसांना माहिती दिली नाही. द्वारकाबाईवर अंतिम संस्कार करण्यात आले. अशा प्रकारे द्वारकाबाईच्या हत्येच्या गुन्ह्यातून आपली सुटका झाली व हा खून पचला असे मुकुंदा लोहार यास मनोमन वाटले. द्वारकाबाईचे दागिने देखील मिळाल्याने त्याला मनातल्या मनात हायसे वाटले. त्यानंतर बरेच दिवस आणि महिने निघून गेले. कुणीही द्वारकाबाईच्या हत्येची तक्रार यावल पोलिस स्टेशनला केली नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात लागला. त्यानंतर कोरोनाची लाट देखील ओसरली. त्यामुळे प्रत्येकजण आपले उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील झाला होता. खूनाचा गुन्हा पचला असे समजून मुकुंदा लोहार याचे धाडस वाढले. यापुढे एकट्या राहणा-या वयोवृद्ध महिलांना ठार करुन त्यांचे दागिने आणि रक्कम लुटण्याचे त्याने ठरवले. त्या दृष्टीने तो एकट्यादुकट्या राहणा-या वयोवृद्ध पेन्शनर महिलांना हेरण्याचे काम करु लागला.

या घटनेनंतर आठ महिन्यांचा कालावधी उलटला. यावेळी त्याची वक्रनजर किनगाव येथील रुख्माबाई कडू पाटील या 70 वर्ष वयाच्या वृद्धेवर पडली. तिच्या अंगावर सोन्याचे दागिने रहात होते. किनगाव येथील चौधरी वाडा परिसरात राहणा-या या वृद्धेचा मुलगा पारोळा या गावी रहात होता. रुख्माबाई किनगाव येथे एकटीच रहात होती. ती रहात असलेल्या घराजवळ वेल्डींग दुकानावर मुकुंदा काम करण्यासाठी येत असे. वेल्डींगचे काम करत असतांना त्याने रुख्माबाईसह तिच्या घराची रेकी करुन घेतली. आठ महिन्यापुर्वी द्वारकाबाईची सोने व रोख रकमेसाठी ज्याप्रमाणे हत्या केली अगदी तशाच पद्धतीने रुख्माबाईची हत्या करण्याचे त्याने यावेळी देखील ठरवले. तो रुख्माबाईच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होता. अखेर रुख्माबाईच्या जीवनातील तो अखेरचा दिवस आला. 19 ऑक्टोबर 2021 च्या दुपारी दिड वाजताच मुकुंदाने रुख्माबाईच्या घरात प्रवेश केला.

गेल्यावेळेप्रमाणे यावेळी देखील मुकुंदाने खूनाचा गुन्हा केला. रुख्माबाईचा रुमालाने गळा आवळून हत्या करण्यात आली. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत मुकुंदाने पलायन केले. रुख्माबाई मयत अवस्थेत घरात पडून होती. या घटनेची माहिती मिळताच तिचा नातू शामकांत पाटील व  इतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. रुख्माबाईचा नातू शामकांत पाटील याला आजी रुख्माबाईचा घातपात झाल्याची शंका आली. त्याने तिच्या गळ्यावरील व्रणाचे मोबाईलमधे फोटो देखील काढून घेतले. मात्र दरम्यानच्या कालावधीत रुख्माबाईच्या लहान भावाचे देखील निधन झाले होते. भावाच्या निधनाचा मानसिक धक्का बसल्याने कदाचीत आजीचा मृत्यु झाला असावा अशी सर्वांनी मनाची समजूत करुन घेतली. तरी देखील यावल पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यात आली. 20 ऑक्टोबर 2021 रोजी यावल ग्रामीण रुग्णालयात रुख्माबाईच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यानंतर आजी रुख्माबाईच्या मृत्युच्या कारणाकडे दुर्लक्ष करत तिचे अंत्यसंस्कार आटोपण्यात आले. पोलिसांनी  या घटनेबाबत केवळ अकस्मात मृत्यूची नोंद घेत विषय संपवला. अशा प्रकारे या गुन्ह्यातून देखील आपली सुटका झाली अशी मुकुंदाची समजूत झाली. दुसरा खून देखील पचल्यामुळे मुकुंदाचे धाडस वाढले. आता यापुढे एकट्या दुकट्या पेन्शनर, अंगावर दागिने असणा-या वृद्ध महिलांनाच आपले सावज करण्याचे त्याने मनाशी पक्के केले. दोन खून करुन देखील आपले काहीच वाकडे होत नसल्यामुळे मुकुंदा मनातून खुश होता. मात्र एक दिवस आपले सर्व गुन्हे उघडकीस येणार हे त्याला अद्याप समजलेच नव्हते. पुन्हा दिवसामागून दिवस आणि महिने निघून गेले.

सन 2021 या वर्षात त्याने केलेले खूनाचे दोन गुन्हे अद्यापतरी पचलेले होते. आता वर्ष उलटून सन 2022 लागले. कोरोनाची दुसरी लाट देखील ओसरली होती. सन 2022 मधे तिसरा गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असतांना त्याची वक्रदृष्टी आता किनगाव येथीलच मराबाई   सखाराम कोळी या 70 वर्ष वयाच्या वृद्ध महिलेवर पडली. मराबाई कोळी एके दिवशी रेशनचा सामान घेण्यासाठी दुकानावर आली होती. त्यावेळी तिच्याकडे रेशन जास्त असल्यामुळे तिला मदतीची गरज होती. वृद्ध मराबाईस मदत करण्याच्या बहाण्याने मुकुंदाने तिचे सामान उचलून ते तिला घरापर्यंत पोहोचवून दिले. घरापर्यंत रेशनचे सामान घेऊन आलेल्या मुकुंदाने तिच्या घराची यावेळी रेकी करुन घेतली. वृद्ध मराबाई घरात एकटीच रहात असल्याची मुकुंदा लोहार याने पक्की खात्री करुन घेतली. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करण्याचे त्याने मनाशी ठरवले. यापुर्वीचे दोन गुन्हे पचल्यामुळे हा गुन्हा देखील सहज पचून जाईल असे त्याला वाटत होते.

23 मे 2022 रोजी किनगाव येथील रामराव नगर परिसरात राहणा-या मराबाई सखाराम कोळी (70) या वृद्ध महिलेचा त्याने रुमालाने गळा आवळला. गळा आवळल्याने जीव गुदमरुन मराबाई जमीनीवर निपचीप पडली. मराबाईने जीव सोडल्याचे समजून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत मुकुंदाने पलायन केले. शेजारी पाजारी राहणा-या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लागलीच या घटनेची माहिती यावल पोलिस स्टेशनला कळवली. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मराबाईच्या अंगात अद्याप जीव होता. तिचा श्वास कमी अधिक प्रमाणात सुरु होता. तिचा जीव वाचवण्यासाठी तिला लागलीच जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला या घटनेप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गु.र.न. 235/2022 भा.द.वि. 392, 394 प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान मराबाईचा मृत्यु झाला. त्यामुळे या गुन्ह्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भा.द.वि. 302 व  397 हे वाढीव कलम लावण्यात आले.

या घटनेबाबत पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी गांभिर्याने घेत जाणीवपुर्वक लक्ष घातले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे घटनास्थळावर हजर झाल्यामुळे लागलीच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, सहायक पोलिस अधिक्षक अशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले आदींनी देखील घटनास्थळावर हजेरी लावली. घटनास्थळावर अधिकारी वर्गाला एक चप्पल आढळून आली. या चपलेवरुन आरोपीचा माग काढण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी अधिकारी वर्गाला दिल्या. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकावर सोपवण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक तयार करण्यात आले. या पथकात सहायक फौजदार वसंत ताराचंद लिंगायत, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोहेकॉ संदिप श्रावण सावळे, पोलिस नाईक किरण मोहन धनगर, प्रमोद अरुण लाडवंजारी, राहुल जितेंद्रसिंग पाटील, ईश्वर पंडीत पाटील आदींचा समावेश करण्यात आला. घटनास्थळावर मिळून आलेली चप्पल कोणत्या डिलरकडून वितरीत झाली याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शोध पथकाकडून करण्यात आला. याशिवाय तांत्रीक आणि खब-यांची देखील मदत घेण्यात आली. 

घटनास्थळावर मिळून आलेल्या चपलेचा डिलर शोधून काढल्यानंतर त्या चपलेचा किनगावपर्यंत कसा प्रवास झाला याचा सर्व तपशील जमा करण्यात आला. चपलेचा किनगाव पर्यंत झालेला प्रवास, तांत्रीक माहितीचे विश्लेषण आणि खब-यांनी दिलेली माहिती आदींची बेरीज जुळल्यानंतर संशयाची सुई मुकुंदा ऊर्फ बाळू बाबुलाल लोहार याच्याकडे जावून थांबत होती. त्यामुळे चौकशीकामी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्ह्यांचा घटनाक्रम उलगडण्यास सुरुवात केली. एकामागून एक असे तिन गुन्हे त्याच्या मुखातून उलगडले.

पहिल्या गुन्ह्यात मयताच्या नातेवाईकांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा खून आतापर्यंत पचला होता. दुसरा गुन्हा पोलिसांनी केवळ अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन प्रकरण मार्गी लावल्यामुळे तो देखील आतापर्यंत पचला होता. तिस-या गुन्ह्यात मात्र स्वत: पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी जाणीवपुर्वक लक्ष घातल्यामुळे तो आणी यापुर्वीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आले. दुस-या गुन्ह्याच्या तपासात हलगर्जीपणा करणा-या संबंधीत अधिका-यास पोलिस अधिक्षक डॉ. मुंढे यांनी नोटीस दिली आहे. यापुर्वी झालेल्या दोन्ही हत्येप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे यावल पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आले. तिन्ही गुन्ह्याप्रकरणी तिन वेगवेगळे खूनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचा तपास सुरु करण्यात आला.

अशा प्रकारे मुकुंदा लोहार हा सिरियल किलर असल्याचे स्पष्ट झाले. त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावल पोलिस स्टेशनचे पोलिस अधिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे. खून केल्यानंतर जळगावात विक्री केलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले. ‎पोलिस‎ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या‎ मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक‎ विनोद गोसावी, सहाय्यक फौजदार‎ नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ‎ पाटील, सलीम शेख, उल्हास राणे,‎ सुनील जमदाडे यांच्या पथकाने‎ त्यास न्यायालयात हजर केले. ‎पोलिस कोठडीत असलेल्या सिरियल किलरला सध्या चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या या गुन्ह्याचा पुढील तपास यावल पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विनोदकुमार गोसावी आणि पो.उ.नि.सुनिता कोळपकर करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here