जळगाव : अवघ्या तिन मिनीटात दिवसा घरफोड्या करुन मिळालेल्या रकमेने लागलीच मुंबईला व तेथून विमानाने विविध राज्यात पलायन करणा-या घरफोड्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिम्मी उर्फ दिपक विपीन शर्मा (29), रा. गुरुकुल नगर नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या घरफोड्या आरोपीचे नाव आहे. दिवसा घरफोडी करुन लागलीच विमानाने पलायन करण्याची जिम्मीची गुन्हे करण्याची पद्धत आहे.
चोपडा व अमळनेर या दोन शहरात 30 जून रोजी मोठ्या घरफोड्या झाल्या होत्या. या घरफोड्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या अख्यारीत दोन पथके करत होती. त्या पथकात सहायक फौजदार रवी नरवाडे, पोहेकॉ संजय हिवरकर, राजेश मेढे, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, परेश महाजन, मुरलीधर बारी आदींची नेमणूक करण्यात आली होती.
चोपडा व अमळनेर शहरात दिवसा झालेल्या घरफोड्या करण्याची पध्दत समान असल्याचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या लक्षात आले. तांत्रीक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे जिम्मी शर्मा हा नंदुरबार पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार या घटनांमागे असल्याचे त्यांना समजले. या माहितीच्या आधारे आपल्या सहका-यांच्या मदतीने जिम्मी शर्मा यास शिताफीने ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने चोपडा व अमळनेर येथील घरफोड्या केल्याचे कबुल केले आहे. चोपडा शहरातील दोन व अमळनेर येथील एक असे घरफोडीचे तिन गुन्हे उघडकीस आले आहेत. अटकेतील जिम्मी शर्मा याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरफोडीच्या रकमेतून दिल्ली, हरयाणा, राजस्थान, गुजरात असा विमान प्रवास करणा-या जिम्मी शर्मा याच्यावर विविध राज्यात सुमारे तीस ते चाळीस गुन्हे दाखल आहेत. जळगाव शहरात देखील काही वर्षापुर्वी अशाच पद्धतीने घरफोड्या करणारा एक आरोपी होता. तो सध्या चहा विक्री करत आहे. एका पोलिस अधिका-याच्या मदतीने तो सन्मार्गाला लागला आहे.