जळगाव : सालीच्या घरात जावून तुझा नवरा नाही, माझी बायको नाही, आता तु तर आहेस ना असे म्हणत विनयभंग करणा-या मेहुण्याला घराबाहेर काढण्यात आले. मद्याच्या नशेत घराबाहेर आल्यानंतर रस्त्याने चालतांना पडून त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली. या घटनेतील मद्यपी मेहुण्यासह त्याची आई व दोघे भाऊ अशा चौघांविरुद्ध सालीने दिलेल्या फिर्यादीनुसार धरणगाव पोलिस स्टेशनला विनयभंगासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव येथील संजय नगर परिसरात घरगुती कारणावरुन पती पत्नीत भांडण सुरु होते. पतीच्या त्रासाला वैतागून पत्नी तिच्या बहिणीकडे आली व बाथरुममधे जावून बसली. तिच्या पाठोपाठ तिचा पती देखील पत्नीच्या बहिणीकडे अर्थात त्याच्या सालीकडे आला. त्यावेळी घरात कुणी नाही असे सालीने मेहुण्यास सांगत घरात येण्यास मज्जाव केला. तुझा नवरा नाही व माझी बायको नाही, मात्र तु तर आहेस असे म्हणत त्याने सालीसोबत गैरवर्तन सुरु केले. त्याचवेळी त्याची पत्नी बाथरुममधून बाहेर आली. दोघा बहिणींनी त्याला घराबाहेर जाण्यास भाग पाडले.
मद्याच्या नशेत चालत असतांना पाय घसरुन पडल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. या गोष्टीचे वाईट वाटून त्याच्या आई व दोघा भावांनी त्याच्या सालीस शिवीगाळ केली. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. नाना ठाकरे करत आहेत.