नाशिक : सुफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती या अफगाणी धर्मगुरुच्या हत्येचा तपास लागला असून चौघा मारेक-यांना अटक करण्यात आली आहे. सेवेक-याच्या नावावर घेतलेली जमीन व कार बळकावण्यासाठी चालकासह त्याच्या साथीदारांनी अफगाणी धर्मगुरुची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या हत्येप्रकरणी येवला शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोडी एमआयडीसी शिवारात 5 जुलै 2022 रोजी अफगाणी धर्मगुरु सुफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती (28) यांची हत्या करण्यात आली होती. मुळ अफगाण येथील रहिवासी असलेले धर्मगुरु मिरगाव आदित्य हॉटेलच्या मागे वावी ता. सिन्नर येथे रहात होते. गोळीबारीत त्यांची हत्या झाली होती. त्यांचा सेवेकरी अहमद खान याच्या दिशेने गोळीबार करुन त्याला जीवे ठार करण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर मारेकरी धर्मगुरुंच्याच गाडीत बसून पसार झाले होते.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळावर फॉरेन्सिक टिम व श्वान पथकास तातडीने पाचारण करण्यात आले. मयत सैय्यद जरीफ चिश्ती यांच्या मारेक-यांच्या शोधार्थ विविध पथकांची निर्मीती करण्यात आली होती. या गुन्हयातील आरोपीतांनी घटनास्थळावरुन पलायन करतांना सोबत नेलेली महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही 500 ही कार दुस-या दिवशी संगमनेर शहरात कारखाना रोड परिसरात मिळून आली होती. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तपास पथकास मार्गदर्शन व सुचना देत अहमदनगर, पुणे व मुंबई जिल्हयात तपास पथके रवाना केली होती.
फरार आरोपी हे ठाणे, मुंबई परिसरात गेले असल्याची माहिती संगमनेर शहरात तपास सुरु असतांना मिळाली. खब-याकडून मिळालेल्या त्या माहितीच्या आधारे गणेश उर्फ देवा बाबासाहेब झिंजाड उर्फ पाटील रा. शिंदेमळा, लोणी, ता. रहाता, जि. अहमदनगर, रविंद्र चांगदेव तोरे (ड्रायव्हर) रा. शहाजापुर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, पवन पोपट आहेर रा. विठ्ठलनगर, येवला, ता. येवला, जि. नाशिक यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांच्या शोधासाठी तपास पथकाने रात्रभर पाळत ठेवली होती.
अटकेतील आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी येवला शहरातील चिंचोडी एमआयडीसी परिसरात एका प्लॉटचे भूमिपुजन करण्याच्या बहाण्याने सुफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती बाबा यांना बोलावले होते. या प्लॉटचे जरीफ चिश्ती बाबा यांनी भूमीपूजन केले. त्यानंतर ते त्यांच्या कारमधे बसले. त्याचवेळी आरोपींनी चालकाच्या बाजूने जरीफ बाबा यांच्या डोक्यावर पिस्तुलमधून गोळी झाडली. त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्या ताब्यातील कार घेत आरोपींनी पलायन केले.
यातील आरोपी तोरे हा जरीफबाबा यांच्या गाडीवर पुर्वी चालक म्हणून कामाला होता. मयत सुफी जरीफबाबा चिश्ती यांनी त्यांचा सेवेकरी गफ्फार अहमद खान याच्या नावावर जमीन व एक्सयुव्ही कार खरेदी केली होती. ती कार व जमीन आपल्या नावावर करुन घेण्यासाठी नियोजन करुन भुमीपुजनाच्या बहाण्याने जरीफ बाबा यांना बोलावण्यात आले. भूमीपुजन झाल्यानंतर गाडीत बसल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. गफार अहमद खान, गणेश उर्फ देवा बाबासाहेब झिंजाड उर्फ पाटील, रविंद्र चांगदेव तोरे (ड्रायव्हर) व पवन पोपट आहेर अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मथुरे करत आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील, येवला शहर पोस्टे चे सपोनि खंडागळे, सपोउनि नाना शिरोळे, पोहवा रविंद्र वानखेडे, जालिंदर खराटे, पोना सुशांत मरकड, सचिन पिंगळ, विनोद टिळे तसेच पोहवा उदय पाठक, प्रशांत पाटील, पोना विश्वनाथ काकड, नवनाथ वाघमोडे, येवला शहर पो.स्टे. चे पोना शहानवाज शेख, गणेश पवार यांच्या पथकाने या तपासकामी कामगिरी केली.