तिन दिवस हॉलीडे टूरच्या ऑफरने घातली भुरळ;- 55 हजारात फसवणूकीने व्यावसायिकाला भोवळ

On: July 15, 2022 1:47 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): या जगात तिन गोष्टी सहज विकल्या जातात. त्या म्हणजे भय, आशा आणि मोह. अनावश्यक असलेल्या या तिन गोष्टी विकण्यासाठी या जगात पावलोपावली लुटारुंची टोळी दडून बसलेली असते. अनावश्यक असलेल्या या तिन गोष्टी विकणा-या लुटारुंना ओळखण्याची व त्यांच्यापासून सावध राहण्याची दिव्यदृष्टी प्रत्येकाजवळ असायला हवी. मात्र या तिन गोष्टींना बळी पडणा-या व्यक्तीची फसवणूक झाल्याशिवाय रहात नाही. अशा व्यक्तींना हेरुन लुटारु गैरफायदा घेत असतात.

काही दिवसांपुर्वी जळगाव शहरातील एका दुग्ध व्यावसायिकाने नवी-कोरी चारचाकी गाडी शोरुम मधून विकत घेतली. शोरुम मधून गाडी विकत घेतांना त्या व्यावसायिकासोबत त्याचा पुतण्या देखील होता. गाडी विकत घेतांना व्यावसायिकासह त्याच्या पुतण्याचा मोबाईल क्रमांक डिलरच्या स्टाफने घेतला. मोबाईल क्रमांक संगणकात टाईप झाल्यानंतर तो डाटा लिक झाल्याचे म्हटले जात आहे. वस्तू विकत घेतल्यानंतर काही शोरुम मधे ग्राहकास त्याच्या मोबाईल क्रमांकाची विचारणा केली जाते. ग्राहकाने मोबाईल क्रमांक दिल्यानंतर त्यावर विविध ऑफरचे मेसेज येण्याचा धडाका सुरु होतो. याचाच अर्थ ग्राहकांचा डाटा कुठेतरी लिक होतो असे म्हणण्यास वाव आहे.

शो रुम मधून चारचाकी वाहन घेतल्यानंतर दुग्ध व्यावसायीकसह त्याच्या पुतण्याचा मोबाईल क्रमांक घेण्यात आला होता. त्यानंतर लागलीच 10 जून रोजी वाहन मालकाच्या पुतण्याच्या मोबाईलवरील व्हाटस अ‍ॅपवर एक मेसेज आला. आपण नवी गाडी घेतली असून आपणास दोन रात्री व तीन दिवस हॉलीडे व्हाऊचर आपणास दिले जाणार आहे. बुकींग  केल्यास पन्नास हजार रुपयांचे डिस्काऊंट व सिल्व्हर कोटेड मुर्ती मोफत दिली जाणार असल्याचा तो मेसेज होता. व्हाऊचर बुकींगसाठी जळगाव शहरातील हॉटेल फोर सिझन येथे 11 जून रोजी दुपारी तिन वाजता हजर राहण्याचे त्या मेसेजमधे म्हटले होते. सुरुवातील काका पुतण्याने या मेसेजकडे दुर्लक्ष केले.

या दिवशी पलीकडून दुग्ध व्यावसायीकास एक फोन आला. शिल्पा बोलत असल्याचे पलीकडून बोलणा-या तरुणीने त्यांना सांगितले. तुम्ही नवी गाडी घेतली असून तुमची व्हिआयपी कपल म्हणून निवड झाली आहे. त्यासाठी तुम्ही हॉटेल फोर सिझनमधे सपत्नीक यावे अशी लाडीक आमंत्रण पलीकडून बोलणा-या तरुणीने त्यांना दिले. ज्याप्रमाणे पक्षी पकडण्यासाठी सुरुवातीला शिकारी दाणे टाकतो त्याप्रमाणे लुटारु अगोदर काहीतरी आमिष दाखवून मोहात टाकून आमंत्रण देतात. एकदा सावजाच्या रुपात मनुष्य आला म्हणजे त्याला ओल्या कपड्याप्रमाणे निपळून सोडले जाते.

चारचाकी वाहन घेतलेले दुग्ध व्यावसायिक आपल्या पत्नीसह हॉटेल फोर सिझनमधे गेले. त्याठिकाणी नोंदणी केल्यानंतर त्यांना योगेश शिंदे व हर्षद खान नावाच्या दोघांनी कंपनीची माहिती देण्यास सुरुवात केली. लकी कपल म्हणून आमच्या कंपनीने तुमची निवड केली असल्याचे या दोघांनी सांगितले. आमची कंपनी तुम्हाला भारतासह विदेशात ट्रॅव्हल पॅकेज देत असल्याचे सांगण्यात आले. मुळ मुद्द्यावर येत दोघांनी या कथित लकी कपलला 55 हजार रुपयांचा प्लॅन समजावून सांगितला. 55 हजार रुपये भरुन आपल्याला आमच्या कंपनीचे सभासद व्हावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तिन वर्षात 21 दिवस, सहा व्यक्तींना रेल्वे, ट्रॅव्हल्स आणि विमान प्रवास घडवला जाईल. यामधे हॉटेलमधे राहण्याचा व जेवणाचा खर्च व सोबतीला गाईड सेवा समाविष्ट राहणार असल्याचे सांगण्यात आले.

भुरळ घालणारे बोलणे ऐकून जळगावचे हे महाशय प्रभावित झाले. त्यांनी 55 हजार रुपये जमा करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी लागलीच आपल्या पुतण्याला फोन करुन त्याचे क्रेडीट कार्ड घेवून बोलावले. काकाने म्हटल्याप्रमाणे पुतण्याने कार्ड स्वाईप करुन 55 हजार रुपये कंपनीच्या खात्यात वर्ग केले. तुमचा प्लॅन सात दिवसात अ‍ॅक्टीव्हेट होईल त्यानंतर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा असे तिघांना सांगण्यात आले.

15 जून रोजी हर्षद खान याच्या मोबाईलवर या व्यावसायीकाने फोन लावला असता त्याने उचललाच नाही. त्यानंतर शिल्पा नावाच्या कथित तरुणीला फोन केला. परंतु तिच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर कंपनीच्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन लावला असता त्यांनी ई मेल आयडी मागीतला. ई मेल वर आपल्याला वेलकम असा मेसेज येणार असल्याचे पलीकडून बोलणा-याने सांगितले. मात्र कोणताही मेसेज आला नाही. अखेर वैतागून दुग्ध व्यावसायीकाने पुन्हा कस्टमर केअर क्रमांकावर फोन करुन सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर वारंवार फोन करण्यात आला. त्यात या व्यावसायीकाची मानसिकता खराब झाली.

अखेर जळगावच्या या दुग्ध व्यावसायीकाने शेवटचा इलाज म्हणून एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले. हर्षद खान, योगेश शिंदे व  शिल्पा नावाची कथीत तरुणी अशा तिघांविरुद्ध रितसर फिर्याद दाखल करण्यात आली. मोह हे दुखा:चे कारण असते हे या घटनेतून दिसून येते. टूर पॅकेजच्या नावाखाली भामट्या त्रिकुटाने या दुग्ध व्यावसायीकाला मोह विक्री केला. मोहाला बळी पडून दुग्ध व्यावसायीकाने दुख: खरेदी केले. आपला मोबाईल क्रमांक अनोळखी व्यक्तीकडे गेला म्हणजे भामटे लुटारु त्यावर अमिषाचे मेसेज पाठवून मोहाची विक्री करत असतात. या मोहजालात अनेक जण दररोज फसत असतात. हे फसणारे या लुटारुंचे सावज असतात. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment