मास्टर कॉलनीतील मनपा उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जळगाव : ‘निसर्गावरील मानवी अतिक्रमणामुळे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यामुळेच कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ, कोरोनासारख्या महामारी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निसर्गाची जपणूक करणे आणि हरित सुंदर करणे यासह वृक्षसंवर्धनाचा वारसा पुढील पिढीला संस्कारित करणे. यासाठी वृक्ष लावणेच नाहीतर त्यांचे संगोपण करणे ही काळाची गरज आहे. असे सांगत हरित जळगावचे ध्येय झाडे जगवूनच गाठता येईल, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत जळगावकरांनी सहभागी होण्याचे आवाहन मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले.

मेहरूणमधील मास्टर कॉलनी परिसरातील मेमन हाजी इब्राहीम रानानी मनपा उर्दू प्राथमिक शाळा क्र. 36 व 56 आणि मनपा उर्दू माध्यमिक शाळा क्र.1 येथील वृक्षारोपणाप्रसंगी आयुक्त वर्षा गायकवाड बोलत होत्या. याप्रसंगी उद्योजक सुबोध चौधरी, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, अनिल जोशी, अजय काळे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे हेमंत बेलसरे, मुफ्ती हारून शेख, नगरसेवक रियाज बागवान, सुन्ना बी राजू पटेल, युसूफ हाजी, मतिन पटेल, संदीप पाटील, फहीम पटेल, अक्रम देशमुख, शाहीद सय्यद उपस्थित होते. दोघंही शाळेतील जवळपास 1300 विद्यार्थ्यांनी झाडे जगविण्याचा निर्धार केला. झाडे लावण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. निंब, करंज, वड, गुलमोहर, रेन ट्री अशा विविध जातीची 120 च्यावर रोपांची लागवड शाळेत करण्यात आली.

मुफ्ती हारून यांनी कुराणमधील दाखले देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व मुलांना समजून सांगितले. ज्याप्रमाणे मनुष्य त्याचप्रमाणे वृक्ष सांभाळले गेले पाहिजे असेही ते म्हणाले. अ‍ॅड. जमिल देशपांडे यांनी वृक्षसंवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग किती मोलाचा आहे यावर भाष्य केले. अतिन त्यागी यांनी विद्यार्थ्यांशी विज्ञान आणि पर्यावरण याविषयावर सुसंवाद साधला. वातारणातील ऑक्सीजन, सूर्यप्रकाश, अन्नप्रक्रिया अतिन त्यागी यांनी समजून सांगितली. उर्दू शाळा क्र. 56 चे मुख्याध्यापक शे. नईमोद्दीन अमीनोद्दीन, शाळा क्र. 36 चे मुख्याध्यापक शे. कुरबान तडवी, उपमुख्याध्यापक शे. मो. अलीम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी नियोजनासह सहभाग घेतला. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, शंकर गवळी यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. शे. मो. अलीम यांनी सूत्रसंचालन केले. शे. नईमोद्दीन अमीनोद्दीन यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here