सेवानिवृत्त पोलिस अधिका-यासह परिवाराविरुद्ध एसीबीचे आरोपपत्र

अकोला : सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षकासह त्यांची माजी महापौर असलेली पत्नी व तिघा मुलांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपाखाली न्यायालयात 15 जुलै रोजी अमरावती एसीबीने आरोपपत्र दाखल केले आहे. कौलखेड येथील रहिवासी असलेले व सहायक पोलिस निरीक्षक पदावरुन निवृत्त झालेले श्रीराम कजदन गावंडे, भाजपची माजी महापौर असलेली त्यांची पत्नी सुमन गावंडे व त्यांच्या तिघा मुलांविरुद्ध 3650 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बेहिशेबी मालमत्ता संकलीत केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी 20 ऑक्टोबर 2019 रोजी गावंडे परिवाराविरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला होता.

सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम कजदन गावंडे यांच्या सेवा कालावधीत करण्यात आलेल्या परीक्षण कालावधीत सुमारे 1 कोटी 52 लाख 22 हजार 894 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले होते. सदर टक्केवारी 385.65 टक्के जास्त असल्याचे तपासात समोर आले होते. श्रीराम गावंडे यांच्याविरुद्ध कलम 13 (1) (ई) 13(2) नुसार भा.द.वि.च्य कलम 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महाराष्ट्र गवळी समाजाचे तत्कालीन अध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याप्रकरणात संशयित आरोपी असलेले श्रीराम गावंडे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने 14 जुलै रोजी मंजूर केला. न्यायालयाच्या दोन सदस्यीय न्यायपीठाचे न्या. संजय कौल व न्या.एम.एम.सुंदरेश यांनी ट्रायल कोर्टाच्या शर्ती आणि समाधान अटींच्या अधिन सदर जामीन अर्ज मंजूर केला जात असल्याचे आदेशात नमूद केले आहे. एका शैक्षणिक संस्थेच्या संदर्भात हुंडीवाले व गांवडे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर प्रकरण येथील धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणीसाठी न्यायप्रविष्ट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here