महिला आमदारांना अश्लिल मेसेज मिश्रा बंधूंनी पाठवल्याचा गुप्ता यांना संशय

जळगाव : जुन्या वादाची किनार धरुन तलवार हल्ला झाल्याचा बनाव आणि कट रचून तरुणाला खोटी फिर्याद दाखल करण्यास भाग पाडणारे मिश्रा बंधू सध्या जळगाव शहर पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत गेले आहेत. या मिश्रा बंधूंनीच बनावट आधार कार्डच्या आधारे मिळवलेल्या सिमकार्डचा वापर करुन महिला आमदारांना अश्लिल मेसेज पाठवल्याचा संशय माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी वर्तवला आहे. या मिश्रा बंधूंनीच आपल्याला सन 2017 मधे कथित अश्लिल मेसेजच्या खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा संशय गुप्ता यांनी व्यक्त केला असून याप्रकरणी चौकशी व तपास होण्याची मागणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिक्षक डॉ. मुंढे यांच्या अधिपत्याखाली आयपीएस अधिका-याकडून होण्याची देखील मागणी गुप्ता यांनी केली आहे.

शाहू नगर परिसरातील बालकदास बाबा यांच्यासोबत मिश्रा बंधूंचा जुना वाद आहे. या वादातून त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या समर्थकांविरुद्ध तलवार हल्ल्याची खोटी फिर्याद दाखल करण्यासाठी इमरान खान या तरुणाला पुढे करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या मिश्रा बंधूंचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असल्याचे समजते.

सन 2017 मधे महाराष्ट्र राज्यातील काही सन्माननीय महिला आमदारांना त्यांच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज आले होते. तपासाअंती हे मेसेज बनावट आधारकार्डच्या आधारे मिळवलेल्या सिमकार्डवरुन पाठवण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यामुळे याप्रकरणी सन 2018 मधे दीपककुमार गुप्ता यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला होता.

सन 2017 मधे अश्लिल मेसेजचे प्रकरण गंभीर असल्यामुळे चौघा सन्माननीय महिला आमदारांनी (श्रीमती विद्या चव्हाण, श्रीमती मंदा म्हात्रे, श्रीमती निलम गोरे, दिपीका चव्हाण) क्रमश: विले पार्ले, बेलापूर, पुणे शिवाजीनगर आणि नाशिक पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. ज्या सिमवरुन अश्लिल मेसेज आले होते ते बनावट सिम दीपककुमार गुप्ता यांच्या नावावर असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे गुप्ता यांना अटक झाली होती. तपासाअंती ते सिम बनावट असल्याचे व गुप्ता यांचा त्यात सहभाग नसल्याचे देखील उघड झाले होते. आधार कार्डशी संबंधित अधिकृत संस्था युआयएआय ने दिलेल्या माहितीनुसार सदर आधार कार्ड बनावट असल्याचे उघड झाले होते.

या सर्व प्रकरणात सध्या जळगाव शहर पोलिस कोठडीत असलेल्या मिश्रा बंधूंचा हात असल्याचा दाट संशय दीपककुमार गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. मिश्रा बंधूंच्या अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात गुप्ता यांनी जनहीत याचिका दाखल केली होती. त्यामुळे चिडून जावून हा बनावट सिमसह अश्लिल मेसेज व्हायरल होण्याचा प्रकार झाला असल्याचा देखील संशय गुप्ता यांना आहे. बनावट तलवार हल्ल्यासह बनावट सिमसह अश्लिल मेसेजची चौकशी पोलिस अधिक्षक डॉ. मुंढे यांच्या अधिपत्याखाली आयपीएस अधिका-याकडून होण्याची मागणी दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे.

सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या मिश्रा बंधूंना 13 जुलै रोजी ते लॉकअप मधे असतांना मद्य पुरवल्याची चर्चा सुरु झाली आहे. कोठडी कालावधीत दोघा मिश्रा बंधूंना दोघा पोलिस बांधवांनीच मद्य पुरवल्याचे म्हटले जात आहे. जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या दोघा पोलिस बांधवांनीच हा मद्यपुरवठा केल्याचे देखील म्हटले जात आहे. याच दिवशी दोघांनी मद्य प्राशन केल्याबाबतचे नमुने चौकशीकामी घेण्यात आले. ते नमुने प्रयोगशाळेत रवाना करण्यात आले असल्याचे समजते. या घटनेची चौकशी सुरु असली तरी जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत दोघा पोलिस कर्मचा-यांच्या नावाची चर्चा तथा कुजबुज सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here