जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : पत्नीसोबत वाद झाल्यामुळे शाम फकिरा ठाकरे भलताच तणावात होता. संतापात त्याने पत्नी विद्याला लाथ हाणली होती. ती लाथ तिच्या बरगडीत बसल्यामुळे तिच्या शरिरासह मनाला मोठ्या प्रमाणात वेदना झाल्या होत्या. दारु पिण्याचे शाम ठाकरे यास अजिबात व्यसन नव्हते. मात्र पत्नीसोबत वाद झाल्यामुळे शाम ठाकरे यास काही कालावधीसाठी तणावमुक्ती हवी होती. त्या तणावमुक्तीसाठी कधी नव्हे ती आज त्याची पावले मधुशाळेच्या दिशेने अर्थात दारुच्या अड्ड्याकडे वळली. कधी नव्हे ते आज त्याने मद्याचे कडवट घोट घशाखाली रिचवले. कडवट दारुपेक्षा जीवनातील अनुभव जास्त कटू असल्याचे त्याला आज समजले होते. मद्यपानापासून शेकडो मैल दुर असलेल्या शाम ठाकरे यास का कुणास ठाऊक मद्यपानाची दुर्बुद्धी सुचली. मद्यपानाची सवय नसलेल्या शाम ठाकरे याने आज त्याच्या सहनशक्तीपेक्षा अधिक प्रमाणात मद्य रिचवले होते. त्यामुळे जड नजरेने व सुन्न डोक्याने कधी नव्हे तो आज झोकांड्या देत चालत होता.
24 जूनचा तो दिवस होता. दुपारचे साधारण साडेतीन वाजले होते. जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील रहिवासी शाम ठाकरे झोकांड्या देत चिंचखेडा परिसरातील वन क्षेत्राच्या दिशेन चालत आला. मद्याच्या नशेत चालतांना आपण काय बोलत आहोत? कोणत्या दिशेने जात आहोत? त्याला काहीही समजत नव्हते. चालत चालत तो चिंचखेडा परिसरातील वन विभागाच्या क्षेत्रात आला. त्याठिकाणी नथु काळू सुरळकर हा वॉचमन ड्युटीवर हजर होता. वन विभागाच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी नथु काळू सुरळकर याच्याकडे होती. फलोद्यानानजीक राहण्यासाठी त्याला तात्पुरत्या स्वरुपाची झोपडी करुन देण्यात आली होती.
खुर्ची टाकून वनरक्षण करणा-यास बसलेल्या नथु सुरळकर या पहारेक-यास मद्यधुंद शाम ठाकरे अनावश्यक प्रश्न विचारत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करु लागला. ही झाडे इथेच का लावली? ती झाडे तिथेच का लावली? ही झाडे उगीच लावली. तुम्हाला काही कामधंदा नाही क? …… अशा अनावश्यक बडबडी मुळे वॉचमन नथु सुरळकर वैतागला. त्याने सुरुवातीला शाम यास समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र मद्याच्या आहारी गेलेला शाम काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. बोलता बोलता त्याने नथु सुरळकर याच्यासह इतरांना आई वडील व माता भगिणीवरुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नथु सुरळकर अजूनच वैतागला. तरीदेखील सुरुवातीला त्याने शाम यास शांत राहण्यास व निघून जाण्यास सांगितले. मात्र क्षणाक्षणाला शामचा आवाज वाढतच होता. आपण काय करत आहोत याचे भान नसलेल्या शामने जवळच पडलेला फावडा उचलून तो वॉचमन नथु सुरळकरच्या हातावर मारला. त्यामुळे नथुच्या हाताला जखम झाली. त्यानंतर बराच वेळ शाब्दिक चकमक झाल्यानंतर दोघे वेगवेगळ्या मार्गाने निघून गेले.
धरणाच्या दिशेने गेलेला नथु सुरळकर काही वेळाने पुन्हा झोपडीजवळ आला. सायंकाळ झाली तरीदेखील शाम तेथेच हजर होता. आपल्या खुर्चीवर ठाण मांडून बसलेल्या शामला बघून नथू प्रचंड चिडला. एकाएकी नथूच्या मनात संतापाची जोरदार लाट उसळली. सायंकाळचा अंधार झालेला होता. संतापाच्या भरात नथुने जवळच पडलेला दांडा उचलला. तो दांडा त्याने शामच्या गळ्यावर मागच्या बाजूने जोरात आवळून धरला. लाकडी दांड्याचा गळ्याला विळखा पडल्याने मद्यधुंद शाम जागीच मरण पावला. आता या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार नथु करु लागला. आपल्यावर काही बालंट येवू नये म्हणून त्याने मयताच्या चपला त्याच्याच खिशात ठेवल्या. त्याला जवळच असलेल्या झाडीत नेवून टाकले. झोपडीत पडलेल्या शामच्या मोबाईलवर त्याच्या पत्नीचे सारखे सारखे फोन येत असल्यामुळे नथूने तो स्विच ऑफ करुन तो जवळच झाडाझुडूपात टाकून दिला. त्यानंतर जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात तो पुन्हा झोपडीत येऊन बसला. दरम्यानच्या कालावधीत मयत शाम ठाकरेची पत्नी व नातेवाईक त्याला शोधत होते. आता त्याचा मोबाईल देखील बंद झाला होता. संतापाच्या भरात वाद घालून शाम कुठे गेला असेल याची चिंता त्याच्या पत्नीला सतावत होती. दरम्यान रात्रीचा अंधार वाढल्यानंतर वॉचमन नथु सुरळकर आपल्या घरी चिंचखेडा गावी निघून गेला.
25 जून 2022 रोजी दुसरा दिवस उजाडला. नथु सुरळकर पुन्हा आपल्या नोकरीच्या ठिकाणी वन विभागाच्या झोपडीत वॉचमनचे काम करण्यासाठी आला. जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात तो वावरत होता. दुपार उलटून गेली. कुणाचीच काही तक्रार आली नसल्यामुळे नथु अजून निश्चिंत होता. दुपारी चार वाजेच्या दरम्यान एक जोडपे फलोद्यान परिसरात भ्रमण करत होते. त्या महिलेचे लक्ष शाम ठाकरे याच्या मृतदेहाकडे गेले. त्या जोडप्यासाठी शाम ठाकरेचा मृतदेह अनोळखी होता. त्या जोडप्याने या घटनेची माहिती लागलीच ड्युटीवरील वाचमन नथु सुरळकर यास दिली.
या मृतदेहाची माहिती आपल्याला आता समजली अशा अविर्भावात नथू याने पोलिस पाटील व इतरांसह पोलिसांना माहिती दिली. काही वेळाने जामनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने पोलिस उप अधिक्षक भारत काकडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले हे देखील आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. उपस्थित पोलिस अधिका-यांनी घटनास्थळासह मृतदेहाची पाहणी केली. घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी मृतदेहाला ओळखले. त्यामुळे मयताची ओळख पटवण्याचे काम संपले होते.
सुरुवातीला या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. उत्तरीय तपासणीकामी मृतदेह रुग्णालयात रवाना करण्यात आला. मयताच्या पोटात दारु असल्याचा, गळ्यावर व्रण आणि बरगड्यांना मार लागल्याचा अहवाल वैद्यकीय अधिका-यांनी दिला. वैद्यकीय तपासणी अहवालानंतर विंध्या ठाकरे हिच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 294/22 भा.द.वि. 302 नुसार जामनेर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला.
मयत शाम ठाकरे हा कधीही दारु पित नव्हता. त्याच्या पोटात दारु असल्याचे समजल्याने त्याचे नातेवाईक देखील काही वेळ आश्चर्य करु लागले. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी करत होते. घटनेच्या दिवशी तपासाचा भाग म्हणून शामच्या मोबाईलवर पोलसांनी संपर्क केला. मात्र त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. मात्र 26 जून 2022 रोजी तो सुरु झाल्याचे आढळून आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावर जावून मयताच्या मोबाईल क्रमांकावर वारंवार फोन लावून आवाज कुठून येतो याचा शोध घेण्यात आला. काही वेळाने तो मोबाईल घटनास्थळानजीक आढळून आला. घटनेच्या दिवशी मयताचा मोबाईल व चपला घटनास्थळावर नव्हत्या. मात्र घटना उघडकीस आल्यानंतर दुस-या दिवशी मोबाईल व चपला घटनास्थळावरच आढळून आल्या. याचा अर्थ कुणीतरी या दोन्ही वस्तू पुन्हा आणून ठेवल्या होत्या. कधीही दारु न पिणा-या शाम जाधवने मरणाच्या दिवशी दारु घेतली की त्याला घेण्यास भाग पाडली याचा देखील शोध सुरु करण्यात आला.
या घटनेची पोलिसांकडून बारकाईने तपासणी सुरु असल्याची कुजबुज मयत शाम ठाकरे याच्या परिवारात सुरु झाली. पतीसोबत आपला काही वाद झाला नव्हता असे त्याची पत्नी वारंवार सर्वांना कथन करत होती. तिचे माहेर व सासर गंगापुरी या गावातीलच होते. गावातील नातेवाईकांनी लागलीच एक बैठक बोलावली. आपल्याच कुणीतरी नातेवाईकाने कदाचीत शामची हत्या केली असावी अशी शंका या बैठकीत वर्तवण्यात आली. त्यामुळे पोलिसांना कुणी काही सांगायचे नाही असे ठरले. आपलेच लोक जेलमधे जातील व आपली बदनामी होईल असे बैठकीत सर्वांचे एकमत झाले. मात्र इकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाचा मयत शामची पत्नी विद्या हिच्यावर संशय बळावला होता. तिनेच पतीची हत्या केली असावी असा संशय पोलिसांना येत होता. तपासादरम्यान पोलिस पथक घटनास्थळी व गावात आले म्हणजे खरा गुन्हेगार असलेला वॉचमन नथु सुरळकर पोलिस पथकाची जी हुजूरी करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हता. त्यामुळे सुरुवातीला त्याच्याकडे कमी अधिक प्रमाणात तपास पथकाचे दुर्लक्ष झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने मयत शामची पत्नी विद्या हिची विचारपूस सुरु केली. बाई…..बाई नव-याने तुझ्या बरगडीत लाथ मारली होती की नाही खरे सांग असा अंधारात प्रश्नार्थक दगड स.पो.नि. जालिंदर पळे व पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे यांनी मारला. त्यावर तिने म्हटले की हो ….घटनेच्या दिवशी आमचे पती पत्नीचे वाद झाले होते. त्या वादात नव-याने मला लाथ मारली होती. मग कोणत्या दवाखान्यात तु आपला इलाज केला? असा दुसरा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर सरकारी दवाखान्यात गेली होती असे तिने सांगितले. अशा सर्व प्रकारे तिची चाचपणी करुन पाहण्यात आली. मात्र मयताच्या पत्नीचा या गुन्ह्यात कुठेही सहभाग दिसून आला नाही. काही दिवस असेच निघून गेले. मात्र सुगावा लागत नव्हता. दरम्यान तपास रेंगाळत असल्याचे बघून स्थानिक जामनेर पोलिसांचे या तपासकामात कमी अधिक प्रमाणात दुर्लक्ष झाले. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने आपली चिकाटी सोडली नाही. तपास पथक रोज घटनास्थळ परिसरात जावून पान टपरी, ढाबे आदी ठिकाणी बसून चहा पिण्याच्या बहाण्याने घटनेचा कानोसा घेत होते.
प्रत्येक वेळी खरा गुन्हेगार असलेला वॉचमन नथु सुरळकर हा पोलिसांची जी हुजुरी करतच होता. त्यामुळे तपास पथकाचा त्याच्यावरील संशय बळावण्यास सुरुवात झाली. नथु सुरळकर याचे संशयास्पद वर्तन बघता त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढण्याचे फर्मान पो.नि. किरणकुमार बकाले यांनी सोडले. आता संशयाची सुई वॉचमन नथु सुरळकर याच्याकडे सरकली होती. तो किती वाजता कामावर येतो आणि किती वाजता घरी जातो अशी त्याला विचारणा करण्यात आली. आपण सकाळी 9 वाजता कामावर आल्यानंतर सायंकाळी 5 वाजता घरी जात असल्याचे त्याने तपास पथकाला कथन केले. सायंकाळी 5 वाजेनंतर जंगलात थांबण्याची आपल्याला वन विभागाची परवानगी नसल्याचे त्याने अधिक माहितीत सांगितले.
वॉचमन नथु सुरळकर याच्या मोबाईलचा घटनेच्या कालावधीतील सीडीआर काढण्यात आला. घटनेच्या दिवशी 24 जून रोजी रात्री सव्वानऊ वाजेपर्यंत तो घटनास्थळी हजर असल्याचे सीडीआरमधे आढळून आले. 25 जून रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत तो घटनास्थळी हजर असल्याचे आढळून आले. त्यानंतर 26 जूनच्या रात्रीपर्यंत तो घटनास्थळी हजर असल्याचे सीडीआर पाहणीत आढळून आले. वन विभागाच्या नियमानुसार सायंकाळनंतर आपल्याला जंगलात थांबण्याची परवानगी नसल्याचे त्याने अगोदरच तपास पथकाला कथन केले होते. त्यामुळे त्याच्यावरील स्थनिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाचा संशय अधिकच गडद झाला. त्यामुळे प्रत्येक वेळी पोलिसांची जी हुजुरी व पोलिस पथकाच्या कायम संपर्कात राहणा-या नथु सुरळकर यास गोड बोलूनच चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.
घटना कालावधीत तिन दिवस रात्री बराच वेळ तु घटनास्थळी हजर असल्याचे सीडीआर तपासणीत दिसत असल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत आपण तिन्ही दिवस सायंकाळी घरी गेल्याचे सांगू लागला. तुम्हाला मिळालेल्या सीडीआरमधेच काहीतरी गफलत असू शकते असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत संबंधीत मोबाईल कंपनीकडून पुन्हा नव्याने सीडीआर मागवण्यात आला. मात्र पुन्हा तसाच सीडीआर पोलिसांना प्राप्त झाला. त्यामुळे सीडीआर खरा असून वॉचमन नथु सुरळकरचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले.
आता यावेळी त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. पोलिसी खाक्या बघताच त्याने आपला गुन्हा कबुल केला. मयताचा आणि आपला यापुर्वी कोणताही वाद नव्हता. तो आपल्या परिचयाचा देखील नव्हता. मात्र मद्याच्या नशेत त्याने आपल्याशी बराच वेळ विनाकारण वाद घातला. शिवाय आई वडील व माता भगिणीवरुन अर्वाच्च शिवीगाळ केली होती. त्याला जाण्यास सांगून देखील तो जागेवरुन जात नव्हता. त्यामुळे चिडून जावून लाकडी दांड्याने पाठीमागून त्याचा गळा आवळल्याचे नथु सुरळकर याने कथन केले. “शोले” चित्रपटात ज्याप्रमाणे चिडलेला धर्मेंद्र गब्बरसिंगचा लाकडी दांड्याने गळा आवळतो तशा पद्धतीने नथु सुरळकर याने शाम ठाकरे याचा गळा आवळला. “शोले” चित्रपटात धर्मेंद्र गब्बरसिंगवर रहम खाऊन नंतर सोडून देतो व भरीव लाकडी दांडा प्रेक्षकांना खाडकन मोडून दाखवतो. मात्र या घटनेत नथु सुरळकर याने शाम ठाकरे याच्यावर रहम दाखवला नाही. कारण ती वेळ संतापात घडून आली होती. हा खून एक प्रासंगीक खून होता. तो आकस्मिक खून होता. या खूनाचे कोणतेही नियोजन नव्हते. घटनेनंतर मयताचा मोबाइल मृतदेहाजवळ त्याने आणून ठेवल्याचे कबुल केले. मयताला कसे मारले, त्याला खांद्यावर कसे उचलून नेले असे प्रात्यक्षिक पोलिस पथकाने त्याच्याकडून करुन घेतले. मयत शरिराने धष्टपुष्ट होता. त्यामुळे वाटेत दोन ते तिन ठिकाणी पडाव घेतल्याचे त्याने कबुल केले. त्याला अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ विजय चौधरी, भारत पाटील, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोहेकॉ संदिप श्रावण सावळे, पोना रणजित अशोक जाधव, पोना किशोर ममराज जाधव, पोकॉ विनोद सुभाष पाटील, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील, पोना दर्शन हरी ढाकणे, पोका प्रमोद ठाकुर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. घटनास्थळी पोलिस उप अधिक्षक भरत काकडे, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, जामनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. किरण शिंदे आदींनी भेट दिली होती. जामनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गादर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड व त्यांचे सहकारी अमोल वंजारी पुढील तपास करत आहेत.