नाशिक : नाशिक शहरातील एका मोठ्या घरफोडीचा उलगडा नाशिक पोलिसांनी केला आहे. उपनगर परिसरात भरदिवसा झालेल्या या घरफोडीने खळबळ माजली होती. शेअर मार्केटमध्ये झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी एका उच्चशिक्षित तरुणाने गुन्हेगारीच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या मित्राला सोबत घेत त्याने थेट घरफोडी करण्याचा मार्ग पत्करल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
नाशिक गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने नाशिक रोड मधील दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या. आठवडाभरापूर्वी त्यांनी जयभवानी रस्त्यावरील एका “इश्वर” या बंगल्यात केलेल्या घरफोडीत 21 लाख 68 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे हिरेजडीत दागिने, रोकड लंपास केली होती. ‘ईश्वर’ हा बंगला बंद असताना चोरट्यांनी लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आत प्रवेश करत गुन्हा केला होता. तिजोरीतील सोन्या-चांदीच्या हिरेजडीत दागिन्यांसह रोकड ताब्यात घेत चोरट्यांनी चारचाकीने पलायन केले होते. संजय ईश्वरलाल बोरा यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाकडून सुरु होता. हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने मोटवानी रस्त्यावर संशयीत कार थांबवली. या कारमधील दोघांनी रोहन संजय भोळे, ऋषिकेश मधुकर काळे या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.