जळगाव : डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है…….. असे फिल्मी स्टाईल मधे म्हटले जाते. मात्र वाळू माफीया डॉनला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. दोन वर्षापासून पोलिसांच्या पटलावरील वाळू माफीया वॉंटेड आरोपी डॉन रघुनाथ कोळी, रा. भोलाणे ता.जि.जळगाव यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.
नाशिक परिक्षेत्र महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून जिल्ह्यातील पाहिजे, फरार आरोपींची शोध मोहीम 15 ते 30 जुलै दरम्यान राबवली जात आहे. या शोध मोहीमेची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. या मोहीमेचा भाग म्हणून गेल्या दोन वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देणा-या डॉनला पकडण्यात यश आले आहे.
यावल पोलिस स्टेशनला दाखल भाग 5 गु.र.न. 6/22 भा.द.वि. कलम 353, 379, 332, 34 कलमाखाली दाखल गुन्ह्यात डॉन पोलिसांना हवा होता. वाळूची अवैध वाहतुक तसेच महसुल अधिकारी – कर्मचा-यांच्या कामात अडथळा आणल्याबाबत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. जळगाव तालुक्यातील भोलाणे, बांभोरी व जैनाबाद भागात विविध ठिकाणी घर बदलून रहात असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे हे.कॉ. जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोना नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, राजेंद्र पवार आदींच्या पथकाने त्याची शोध मोहीम राबवली. या मोहीमेदरम्यान पथकाने सुरुवातीला भोलाणे गावी जावून त्याच्या शोध घेतला. फरार डॉन जळगाव शहरातील जैनाबाद येथे नातेवाईकाकडे असल्याची माहिती पथकला समजली. अखेर त्याला जैनाबाद येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. पुढील तपासकामी त्याला यावल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.