मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीच्या पथकाने अटक केली आहे. एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) मधील कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधीत मनी लॉड्रिंग प्रकरणी संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सन २००९ ते २०१७ या कालावधीत पांडे यांनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. सुरुवातीला ५ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीकामी ईडीने संजय पांडे यांना बोलावले होते. त्यानंतर आज दिवसभर झालेल्या चौकशीअंती ईडीने संजय पांडे यांना अटक केली आहे.

संजय पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस खात्याचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरु केली होती. सन २००६ मध्ये पांडे पुन्हा पोलीस सेवेत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी आपली आई आणि मुलाला कंपनीचे संचालक केले. पांडेंच्या कंपनीला एनएसईचे सर्व्हर, संगणकीय यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञान वापरण्यात आले.

सीबीआयच्या आरोपानुसार नारायण आणि रामकृष्ण, वाराणसी आणि हल्दीपूर यांनी २००९ ते २०१७ दरम्यान एनएसई कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याचा कट रचला. ज्यासाठी त्यांनी २००१ मध्ये पांडे यांनी स्थापन केलेल्या कंपनीला कामावर ठेवले होते. कथित बेकायदेशीर फोन टॅपिंगसाठी पांडेंच्या कंपनीला ४.४५ कोटी रुपये मिळाल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here