मुंबई : सध्या वेगाने सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या लाटेवर स्वार होत दोघा आमदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखवत त्यांना 100 कोटीची खंडणी मागणा-या चौघांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीत बीजेपीच्या बड्या नेत्यासोबत आपली सलगी असून महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई व जाफर उस्मानी अशी चौघांची नावे आहेत. भाजपचे आमदार राहुल कुल यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिलेल्या माहितीच्या आधारे या कारवाईला मुर्त स्वरुप आले. खंडणीविरोधी पथकाने हॉटेल ओबेरॉय मध्ये आ. राहुल कुल आणि आ. जयकुमार गोरे यांच्यासमोरच सदर सापळा कारवाई करण्यात आली.
आमदार राहुल कुल यांच्या स्वीय सचिवाला रियाज शेख असे नाव सांगणाऱ्या एका तरुणाचा फोन आला होता. आमदार साहेबांशी बोलणे झाले असून, फक्त त्यांच्या खास कामासाठी दिल्लीहून मुंबईत आल्याचे त्याने पलीकडून बोलतांना सांगितले. स्वीय सचिवांनी हा निरोप आ. राहुल कुल यांना दिला. चार दिवसांपूर्वी आपल्याला देखील या व्यक्तीचा फोन आला होता व तो मंत्रीपदासाठी 100 कोटी रुपये मागत होता असे आ. कुल यांनी स्वीय सचिवाला सांगितले. त्या अनोळखी व्यक्तीला भेटण्यासाठी बोलावून घेण्यास आ. कुल यांनी स्विय सहायकाला सांगितले.
ठरल्यानुसार 17 जुलै रोजी हॉटेल ओबेरॉय मध्ये त्याला भेटण्यास बोलावण्यात आले. या भेटीत आ. राहुल कुल यांनी रियाज समवेत दीड तास सविस्तर चर्चा केली. घासाघिस करुन ही रक्कम 90 कोटीवर खाली उतरवण्यात आली. या रकमेचे विस टक्के अर्थात 18 कोटीचा अॅडव्हांस द्यावा लागेल अशी अट रियाजने आ. कुल यांच्याकडे ठेवली. आ. कुल यांनी ती रक्कम देण्याची तयारी दर्शवली आणि दुस-या दिवशी पुन्हा बोलावले. समांतर पातळीवर आ. कुल यांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना देत कारवाईची मागणी केली.
दुस-या दिवशी 18 जुलै रोजी रियाज शेख 18 कोटी मिळण्याच्या आशेने हॉटेलमधे आला. यावेळी आ. कुल यांच्यासमवेत त्यांचा स्विय सहायक आणि आ. जयकुमार गोरे असे हजर होते. त्याचवेळी साध्या वेशात पोलिस देखील दबा धरुन बसले होते. आ. कुल यांनी इशारा करताच पोलिस पथकाने रियाज शेख याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने ठाणे येथील योगेश कुलकर्णी आणि सागर संगवई यांची नावे कथन केली. या दोघांनी पैसे मिळाल्यास मंत्रिपद मिळवून देणार असल्याची माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे योगेश कुलकर्णी आणि सागर संगवई या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांनी दिलेल्या माहितीत नागपाडा येथील जाफर उस्मानी याचे नाव पुढे आले. जाफर उस्मानी याच्या ओळखीचा 50 ते 60 कोटी रुपये देऊन मंत्रीपद मिळवून देत असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत हा गोलमाल मामला असल्याचे उघडकीस आले. चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सात मोबाईल हस्तगत करण्यत आले. या गॅंगचे खरोखरच दिल्लीपर्यंत पोहोच आहे का याची तपासणी केली जात आहे.







