जळगाव : चाळीसगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नसतांना भोळ्याभाबड्या रुग्णांच्या जीवीताशी खेळण्याचा प्रकार चाळीसगाव तालुक्यात सर्रास सुरु असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे. अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दोन व मेहुणबारे पोलिस स्टेशनला तिन असे एकुण पाच गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या पाचही दाखल गुन्ह्यांमधे शासकीय वैद्यकीय अधिकारी फिर्यादी आहेत. याव्यतिरिक्त अजून बरेच बोगस डॉक्टर चाळीसगाव तालुक्यात असल्याचे म्हटले जात आहे. भोळ्याभाबड्या रुग्णांच्या जीवीताशी खेळ करणा-या अशा डॉक्टरांना शोधून काढण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे देखील म्हटले जात आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला बंगाली नावाच्या कथित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपसिंग रतनसिंग राजपूत यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार राजेंद्र साळुंखे करत आहेत. चाळीसगाव ग्रामीण स्टेशनला राजु बिस्वास विधान या पश्चिम बंगाल येथील मुळ रहिवासी व वाघले ता. चाळीसगाव येथे राहणा-या कथित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी (पंचायत समिती) देवराम किसन लांडे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास देखील चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार राजेंद्र साळुंखे करत आहेत.
मेहुणबारे पोलिस स्टेशनला साजल कोमल मुजुमदार रा. पोहरे – चाळीसगाव नावाच्या कथित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धिरज पाटील यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार धर्मराज पाटील करत आहेत. मृणाल तपन सरकार या कथित डॉक्टर विरुद्ध दुसरा गुन्हा लोंढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष निकम यांनी दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक राजेश सांगळे करत आहेत. तन्मय दिपक पाठक रा. उपखेड – चाळीसगाव या कथित डॉक्टर विरुद्ध लोंढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष निकम यांनी गुन्हा दाखल केला आहे,. या गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक प्रकाश चव्हाण करत आहेत. या पाचपैकी एका गुन्ह्यातील कथित डॉक्टरला अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरु आहे.





