आडगाव – नाशिक पोलिसांची कामगिरी
नाशिक : नाशिकच्या तपोवनात काही दिवसांपूर्वी एका इसमाचा अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून खून केला होता. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला होता. परंतु पोलिसांनी या घटनेतील रहस्य उलगडण्यात यश मिळवले. दारूच्या नशेत शाब्दिक वादातून गोपालदास आश्रमात येणाऱ्या संतोष रामकृष्ण पवार या इसमाचा खून झाल्याचे तपासाअंती उघड झाले आहे.
या खून प्रकरणी चुंचाळे शिवारातील संजूनगर येथील रवि उर्फ पिंट्या तुकाराम लिलके यास आडगाव पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंट्या लिलके या संशयिताचे नाव समोर आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. सी. तोडकर, उपनिरीक्षक धैर्यशिल घाडगे, पोलिस हवालदार राजाभाऊ गांगुर्डे, वाल्मिक सुर्यवंशी, योगेश घुगे, जगदीश पाटील आदींच्य पथकाने पिंट्या लिलके यास मुंबईनाका परिसरातून ताब्यात घेत चौकशी केली.
त्याने दिलेल्या जबाबानुसार, सोमवारी रात्री पवार व लिलके या दोघांनी मद्य प्राशन केले होते.मद्याच्या नशेत पवारने लिलके यास फटका मारुन तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली होती. संतापलेल्या लिलकेने रागाच्या भरात राग पवारचा काटा काढण्यचे ठरवले. त्याच रात्री त्याने पवारच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.