नाशिक : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथून कांदीवली येथे रेल्वेने आणत असतांना त्याने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान नाशिकच्या शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. तबारत रयनी उर्फ चिकने (30) रा. बलरामपूर उत्तर प्रदेश असे मयत झालेल्या आरोपीचे नाव आहे.
तबारत रयनी उर्फ चिकने याने कांदिवली पश्चिमेकडील इमिटेशन ज्वेलरी शॉप मधून लाखो रुपये किमतीच्या तांब्याच्या प्लेट्स चोरी केल्या होत्या. या घटनेप्रकरणी कांदीवली पोलिस स्टेशनला गु.र.न. 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर तो उत्तर प्रदेशात त्याच्या गावाकडे पळून गेला होता.
कांदिवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहन कदम यांच्यासह हे.कॉ. जैतापकर, पो. कॉ. राऊत, पो. कॉ. केसरकर आदींचे पथक त्याच्या मागावर बलरामपूर येथे गेले होते. स्थानिक ललिया पोलिसांच्या मदतीने त्याला बलरामपुर येथे अटक करण्यात आली. अटकेनंतर 20 जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजता पोलिस पथक लखनऊ येथून पुष्पक एक्सप्रेसने मुंबई येथे परतीच्या प्रवासासाठी निघाले. वाटेत 21 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मनमाड जंक्शन नजीक लघवीच्या बहाण्याने त्याने पो.कॉ. केसरकर यांच्या हाताला झटका देत धावत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यात तो जबर जखमी झाला.
मनमाड जंक्शनला ट्रेन थांबल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आला. या घटनेची माहिती मनमाड पोलिस स्टेशनला देण्यात आली. जखमी आरोपी तबारत रयने उर्फ चिकने हा रेल्वे रुळानजीक जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला प्राथमिक उपचारार्थ उप जिल्हा रुग्णालय, मनमाड येथे व त्यानंतर शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे आंतररुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 22 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला.