मोटार सायकल चोरटे एक वर्षांनी एलसीबीच्या जाळ्यात

On: July 26, 2022 6:08 PM

जळगाव : शेतात शेतकरी काम करत असतांना बांधावरील त्यांची मोटार सायकल शिताफीने चोरुन नेणा-या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दिपक भास्कर सपकाळे व राजु बुधो सपकाळे (दोघे रा. धामणगाव ता.जि.जळगाव) अशी त्यांची नावे आहेत. एक वर्षानंतर चोरीच्या मोटार सायकलसह चोरटे पोलिस पथकाच्या हाती लागले.

चोरटे आणि मोटार सायकल सापडल्याने फिर्याद दाखल करणा-या शेतक-याच्या चेह-यावर समाधान झळकले आहे. “तपासाला लागले वर्ष मात्र शेतक-याला झाला हर्ष” असाच काहीसा हा प्रकार या तपासातून दिसून आला आहे. चोरीला गेलेल्या मोटार सायकलचा शोध लागल्याने फिर्यादी शेतक-याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाचे आभार मानले आहे.

अरुण देवराम चौधरी रा. आव्हाणे ता. जळगाव हे त्यांच्या भावाची मोटार सायकल शेतात ये जा करण्यासाठी वापरत होते. 1 नोव्हेंबर 2021 रोजी ते मोटार सायकलने शेतात गेले होते. शेताच्या बांधावर मोटार सायकल उभी केली असतांना दिपक भास्कर सपकाळे व राजु बुधो सपकाळे या दोघा चोरट्यांनी त्यांची मोटार सायकल चोरुन नेली होती. दोघेही पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आहेत. या घटने प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुरनं 297/2021 भादवि 379, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, भारत पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपासकामी अटकेतील दोघांना जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment