लाखो रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या चालकास अटक

On: July 26, 2022 10:17 PM

जळगाव : ठिबक नळ्यांच्या मालाची डीलीव्हरी केल्यानंतर आलेली रक्कम घेऊन पसार झालेल्या चालकास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने नेरी येथून अटक केली आहे. पंकज रघुनाथ सोनवणे रा. कुसुंबा – जळगाव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

एमआयडीसी परिसरातील ठिबक नळ्या तयार करणा-या कंपनीत पंकज सोनवणे हा चालक म्हणून कामाला होता. गेल्या वर्षी सन 2021 मधे कंपनी व्यवस्थापक चिराग शहा यांनी चालक पंकज सोनवणे यास जालना येथील तिघा व्यापा-यांकडे ठिबक नळ्या घेऊन रवाना केले होते. जालना येथील तिघा व्यापा-यांकडून जमा करण्यात आलेली एकुण रक्कम 2 लाख 81 हजार 400 रुपये त्याने कंपनीत जमा केली नाही. आपल्या ताब्यातील बोलेरो पिक अप वाहन एमआयडीसी परिसरात लावून तो पसार झाला होता. याप्रकरणी व्यवस्थापक चिराग शहा यांनी 5 मार्च 2021 रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आरोपी पंकज सोनवणे याचा शोध सुरु होता. त्याच्या शोधार्थ पुणे व गोवा येथे गुन्हे शोध पथक जावून आले होते.

15 जुलै ते 31 जुलै 2022 दरम्यान पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने फरार आरोपींची शोध मोहीम सुरु आहे. या मोहिमेच्या अंतर्गत पंकज सोनवणे याचा देखील कसून शोध सुरु होता. सदर गुन्हयातील आरोपी पंकज रघुनाथ सोनवणे हा नेरी येथे रहात असल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक किशोर पाटील, मुदस्सर काझी, योगेश बारी, मुकेश पाटील, छगन तायडे आदींनी त्याला नेरी येथून ताब्यात घेत अटक केली आहे. न्या. श्रीमती जे.एस. केळकर यांच्यासमक्ष त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 30 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. स्वाती निकम यानी न्यायालयीन कामकाज पाहीले. सदर गुन्हयाचा पुढील सहायक फौजदार अतुल वंजारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment